पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर…; फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट यांच्यात राडा होऊन पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले असून पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही शांत राहणार नाही असा इशारा महाविकास आघाडीला दिला आहे. ते पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ज्याप्रकारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ले होत आहेत. सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमच्यावर हल्ले करू ही मानसिकता चुकीची आहे. विरोधी पक्षाचं काम सरकारच्या विरुद्ध बोलणं आहे. सरकारचे घोटाळे बाहेर काढणं आहे. त्यांना लक्ष्य केलं जातय, सरकराने विशेषता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांना सुरक्षा द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने सुरक्षा दिली पाहिजे असे फडणवीस यांनी म्हंटल.

यावेळी त्यानी जितेंद्र आव्हाड यांना तत्कालीन भाजप सरकार असताना दिलेल्या सुरक्षेचा दाखला दिला. आमच्या काळात अशाचप्रकारची धमकी ज्यावेळी जितेंद्र आव्हाड यांना आली होती आणि शरद पवार मला बोलले होते. ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा आमच्या विरोधात काय बोलतात याचा विचार न करता. तत्काळ त्यांना मी सुरक्षा दिली होती. सरकारचं हे काम असतं, त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सुरक्षा दिली पाहिजे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत