हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान उड्डाण वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने एअर इंडियाला (Air India) तब्बल 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेवारी महिन्यात DGCA ने एअर इंडियाचे स्पॉट ऑडिट केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता एअर इंडियाला भरपाई म्हणून 80 लाख रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी देखील DGCA ने विविध कारणांना घेऊन एअर इंडियाला दंड ठोठावला होता.
मुख्य म्हणजे, यावेळी कारवाई करताना DGCA ने आपल्या निवेदन पत्रात म्हटले आहे की, “अहवाल आणि पुराव्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की मेसर्स एअर इंडिया लिमिटेडने काही प्रकरणांमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन्ही फ्लाइट क्रूसह उड्डाणे चालवली, जे विमान नियम, 1937 च्या उप-नियम 28A चे उल्लंघन करते,” यामुळेच DGCA ने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, यापूर्वी DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आला होता. एअर इंडियाकडून एका 80 वर्षीय प्रवाशाला व्हीलचेअरची सेवा पुरवण्यात आली नव्हती. त्यामुळे या वृद्ध प्रवाशाला विमानातून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागले होते. याचाच त्रास या प्रवाशाला होऊ लागला आणि त्याची प्रकृती बिघडली. यानंतर काही वेळातच या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले होते.