कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड (जि. सातारा) सोमवार पेठेतील कन्या असणारी धनश्री सुनिल कुंभार (वय- २७) हिचा २ फेब्रुवारीला अभ्यासिकेला जात असताना पुण्यात मोठा अपघात झाला आहे. समाजातील गरिब, अनाथ, अपंग विद्यार्थ्यांच्यासाठी धडपड करत स्वताः प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या धनश्रीला आता समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे. धनश्रीच्या घरची परिस्थिती बेताची असून उपचारासाठी लागणारा अर्थिक खर्च हा लाखांत आहे. तेव्हा सामाजिक, शैक्षणिक कार्यात काम करणाऱ्या या कन्येच्या उपचारासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आवाहन करत आहेत.
सकाळी पावणेनऊ वाजता अभ्यासिकेला निघाली होती. अगदी ५ ते १० मिनिटांत रिक्षाचालक चुकिच्या दिशेने आला आणि एका चारचाकीला ओव्हरटेक करून धनश्रीला धक्का देवून निघून गेला.तेथील लोकांनी तिला चैतन्य हॉस्पीटल येथे नेले मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने तेथे ॲडमिट करून घेतले नाही. तेथून माई मंगेशकर हॉस्पीटलमध्ये एक ते दीड तासांसाठी ॲडमिट केले होते. पुढे जहाँगिर हॉस्पीटलमध्ये दोन दिवस ठेवले होते. त्यापुढे नवले हॉस्पीटलला गेली तेरा दिवस अॅडमिट आहे. तिच्यात थोड्याफार प्रमाणात सुधारणा होत असल्याचे धनश्रीचे वडिल सुनिल कुंभार यांनी सांगितले.
धनश्रीच्या कुटुंबाची उपचारासाठी १५ लाख इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची परिस्थिती नसल्याने त्यांनी मदतीचं आवाहन केलंय. तसेच सध्या सांगितलेल्या खर्चाच्या रक्कमेतही वाढ होवू शकते असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले आहे. विशेष म्हणजे धनश्रीच्या मदतीला सामाजिक क्षेत्रातील अनेक लोक पुढे आलेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना धनश्रीला शक्य ती आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलंय.
धनश्रीच्या कुटुंबाकडून तिच्यावर उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. गेली ९ वर्ष पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या कुंभार कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी मदत गोळा करत आहेत, तर दुसरीकडे धनश्रीला गंभीर दुखापत करणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाईचीही मागणी करत आहेत. अद्यापही आरोपी रिक्षाचालकाला अटक न झालेली नाही.
धनश्रीला रिक्षाचालकाने इतकी जोराची धडक दिली की ती जाग्यावरच बेशुद्ध झाली. याच अवस्थेत स्थानिकांनी धनश्रीला स्थानिक दवाखान्यात दाखल केले. यानंतर सध्या तिच्यावर नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत तिच्या उपचारावर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झालाय. तिच्या उपचारासाठी जवळपास १५ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी धनश्रीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास वेळ लागणार असल्याचं सांगितलंय. सध्य परिस्थितीत कोमातून बाहेर येईपर्यंत तिच्यावरील उपचाराचा खर्च हे मोठं आव्हान असल्याची भावना तिचे वडिल सुनिल कुंभार यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.
धनश्रीची ओळख व कार्य
धनश्री कुंभार सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील सोमवार पेठ येथील रहिवासी आहे. धनश्रीचे विद्यालयीन शिक्षण लाहोटी कन्या प्रशाला कराड तर महाविद्यालयीन शिक्षण एजीएम कॉलेज येथे झाले आहे. ती शिक्षणासाठी पुण्यात आली. तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतलं. धनश्रीने पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचंही शिक्षण घेतलं होतं.
तिला स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचं होतं. यासाठी ती पुण्यातील शिवणे-उत्तमनगर येथे राहत होती. विशेष म्हणजे ती स्वतः स्पर्धा परीक्षेची तयार करत असताना असंच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक गरीब विद्यार्थ्यांनाही मदत करत होती. त्यांच्या अडचणींसाठी नेहमी लढत होती आणि या गरीब मुलांना मोफत शिकवतही होती.
सामाजिक संवेदना जाग्या असलेल्या धनश्रीने अनेक सामाजिक लढ्यांमध्ये देखील सहभाग नोंदवला आहे. धनश्रीने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे पुणे शहर सचिव म्हणूनही काम केलं आहे. तसेच ‘राईट टू लव’ मोहिमेत समन्वयक म्हणूनही काम केलंय. मुक्त पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मिडियात तिने का केले आहे. सध्या ती राज्यसेवेचा अभ्यास करत होती.
एमपीएससी पास मात्र सिलेक्शन हुकले
धनश्री कुंभार ही एमपीएससी व यूपीएससी परिक्षेचा अभ्यास करत आहे. मंगळवारी २ फेब्रुवारीला सकाळी ९ च्या सुमारास अपघात झाला तेव्हा ती अभ्यासिकेलाच निघाली होती. यापूर्वी तिने एमपीएससी परिक्षेत यश मिळवले. परंतु केवळ २ मार्कांनी तिचे सिलेक्शन हुकले होते. तरीही धनश्री न खचता तिने पुन्हा एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला होता.
मदत कशी कराल?
गुगल पे नंबर : 9922778408 (सुनिल कुंभार – धनश्रीचे वडील)
बँक खाते तपशील
Sunil Anant Kumbhar
Bank of India Brand
Warje Malwadi (Pune)
SAVING ACCOUNT NO.
053310110008792
IFSC : BKID0000533