बीड, प्रतिनिधी, नीतीन चव्हाण : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाला न जुमाननाऱ्या बजाज कंपनीला जोरदार दणका बसला असून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही बीड जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९४३ शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावावर निर्णय न घेता त्यांना विमा नाकारल्याप्रकरणी अखेर बजाज अलियांज कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सदर कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून कंपनीच्या वतीने करार करणारे अधिकारी आणि कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीक विम्याच्या संदर्भाने कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची कदाचित राज्यातील ही पहिली घटना असावी .
बीड जिल्ह्यात मागच्या काही वर्षांपासून पीक विम्याचा प्रश्न सातत्याने गंभीर होत आलेला आहे . शेतकऱ्यांचे विमा दावे देण्यापेक्षापेक्षा ते नाकारण्याकडे विमा कंपन्यांचा कल अधिक राहिलेला आहे. त्यातच २०१८ -१९ च्या रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या विमा भरपाईचा प्रश्न गंभीर झाला होता. या वर्षात विमा कंपनीने ७ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ३२४ कोटीची नुकसान भरपाई दिली, मात्र १ काह ३४ हजार ९४३ प्रकरणांवर निर्णयच घेतला नाही. या शेतकऱ्यांच्या विमा भरपाई संदर्भात विविध संघटना , लोकप्रतिनिधी यांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला होता, तसेच प्रशासनाने देखील सातत्याने कंपनीला निर्णय घेण्याबद्दल सांगितले होते . मात्र कंपनीने या दाव्यांवर निर्णय तर घेतला नाहीच, मात्र अगदी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेले निर्देश देखील डावलले. विमा धारक शेतकऱ्यांची आणि सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच कंपनीने हे कृत्य केल्याचा ठपका ठेवत १७ जानेवारी रोजीच्या आढावा बैठकीत बंदीचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सदर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार २० जानेवारी रोजी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला पत्र दिले होते.
गुन्हा दाखल करण्यावरून पोलीस आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून रोज चर्चा होत होती, मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब होत होता. अखेर मंगळवारी (दि. ४ ) तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी शिवाजी नगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य सरकारसोबत करार करणारे कंपनीचे अधिकारी आशिष अग्रवाल ,आणि जिल्हा प्रतिनिधी रितेश सिंग व मनीष दुपारे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे दाखल झाले म्हणजे न्याय नाही – गंगाभिषण थावरे
आपण नेहमी विमा कंपन्याच्या समोर शेतकऱ्यांचा आवाज घेऊन गेलो आहोत . शेतकऱ्यांना फसवले म्हणून कंपनीवर गुन्हा दाखल झाला हे चांगलेच मात्र जोवर शेतकऱ्यांना त्यांच्या विम्या संदर्भात दिलासा भेटत नाही तोवर समाधान व्यक्त करता येणार नाही . जो पर्यंत वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोवर आपण लढा देऊ असे गंगाभिषण थावरे यांनी म्हटले आहे .