हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तापी नदीच्या खोऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील रांगड्या मातीतला आणि नानाविध समाजाची लोक गुण्यागोविंदाने राहणारा जिल्हा म्हणजे धुळे. याच धुळ्याच्या राजकारणाला मात्र भाजपने गारुड घातलंय. याला खोडून काढण्याचे मोठा आव्हान विरोधकांसमोर असणार आहे. सलग दोन टर्म निवडून आलेल्या भाजपच्या उच्चविद्याविभूषित माजी राज्यमंत्री आणि विद्यमान खासदाराला निवडून येण्यासाठीचा रस्ता क्लियर का दिसतोय? वास्तविक पाहता धुळ्यात भाजप फारशी स्ट्रॉंग नसतानाही खासदारकी पक्षाला इतकी सोपी का जातीये? धुळे लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा बदलता इतिहास कसा राहिलाय? हेच सगळं आज आपण जाणून घेऊयात
सर्वात आधी पाहूयात की धुळे लोकसभा (Dhule Lok Sabha 2024) मतदारसंघाची भौगोलिक रचना नेमकी कशी आहे ते! धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील तीन धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा आणि नाशिक मधील तीन मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि बागल या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहा विधानसभा मतदार संघांपैकी मालेगाव मध्य तसेच धुळे शहर या दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार आहेत. भाजपचे दोन आणि काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे मतदारसंघात महायुतीला चांगला स्कोप आहे. धुळे लोकसभा मतदार संघात आजपर्यंत काँग्रेसने १० वेळा आणि भाजपने पाच वेळा तर जन्संघाने एकवेळा विजय मिळवलाय.
थोडसं इतिहासात जायचं म्हटलं तर सुरुवातीपासूनच काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या धुळे लोकसभेवरची पक्षाची पकड 1999 साली सैल झाली आणि भाजपचे रामदास गावित यांनी काँग्रेसचे बापू चौरे यांना धूळ चारत भाजपला पहिल्यांदाच धुळ्यात प्रवेश करू दिला. 2004 च्या निवडणुकीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं 2004 साली बापू चौरे हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होत त्यांनी भाजपच्या गावितांचा मागील टर्मचा वचपा काढला.मात्र यानंतर म्हणजे 2009 पासून धुळ्यात फक्त भाजपचाच शब्द चालायला लागला. 2009 साली प्रतापराव सोनवणे यांनी काँग्रेसचे अमरीश पटेल यांचा पराभव करत भाजपला पुन्हा जिल्ह्यात एंट्री दिली. 2014 ला काही केल्या केंद्रात मोदींची सत्ता आणायची होती त्यासाठी भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची होती. म्हणूनच धुळ्यासाठी नव्या राजकीय चेहऱ्याची शोधाशोध सुरू झाली आणि यातूनच डॉ. सुभाष भामरे यांचं नाव समोर आलं. डॉ. भामरे कर्करोगासंदर्भात जे. जे. रुग्णालय, ग्रांट मेडीकल महाविद्यालय आणि टाटा कर्करोग रुग्णालय इथं वैद्यकीय तज्ञ म्हणून काम पाहत होते. कॅन्सरतज्ञ म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. तसेच त्यांना राजकीय वारसा देखील मिळाला होता.
डॉ. भामरे यांनी 2004 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यात त्यांच्या मातोश्री गोजराबाई रामराव भामरे या साक्री मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होत्या. याआधी भामरे यांना काँग्रेस आणि शिवसेनेतील कामाचा अनुभवही होता. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत, राजकारणाचा अनुभव आणि उच्चविद्या विभूषित उमेदवार दिल्यास धुळेकर त्याला हमखास निवडून देतील असा एक भाजपचा विचार होता. आणि तो खरा देखील ठरला. 2014 साली भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरीश पटेल यांचा पुन्हा पराभव करत दिल्ली गाठली. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर संरक्षण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्मला त्यांच्या पॉलिटिकल करिअरचा ग्राफ एकदम उंच झाला. संसदेच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केलं. या पदांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाच्या मोठ्या योजनांना मंजुरी मिळवली होती. त्याच्याच जोरावर त्यांनी 2019 ला प्रचारही केला. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत पुन्हा भामरेंनाच भाजपकडून तिकीट देण्यात आलं. तेव्हासुद्धा 2019 च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना 2 लाख 29 हजार 243 इतक्या लीडने आसमान दाखवत दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली.
दिल्लीतील प्रदीर्घ वावरानंतर आणि अभ्यासू खासदार अशी ओळख मिळवून त्यांनी मतदारसंघासाठी बराच निधी आणला…विकास कामांचा सपाटा चालवला…विविध योजना राबवत जनसंपर्क तगडा केला…म्हणूनच भामरे पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा विजय निश्चित असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतायत. भाजपने सत्तर वर्षे वय असलेल्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण स्वीकारल्यास भामरेंचा पत्ता कट होऊ शकतो, असं बोललं गेलं…आमदार जयकुमार रावल आणि नुकतेच भाजपात आलेले माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर आमदार दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या नावासाठी सुद्धा या मतदारसंघात जोरदार लॉबिंग झाली… मात्र भाजपने ही सिट आपल्याकडेच ठेवत भामरेंवर पुन्हा विश्वास टाकला… त्यात भामरेंच्या विरोधात आघाडीचं धुळ्यातील गणित काही जुळून येण्याची सध्यातरी चिन्हं दिसत नाहीयेत. त्यामुळे धुळ्यात भामरे खासदारकीची हॅट्रिक करणार का? धुळ्याच्या एकंदरीत राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…