कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण :- सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, विजेचे सुस्थितीतील दिवे आदी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसलेले पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बसस्थानक चोरट्यानी पुन्हा लक्ष्य केले आहे. पहाटेच्या सुमारास स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून डिझेल चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठे उत्पन्न देणाऱ्या स्थानकाचे हे दैन्य एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसणार तरी कधी?असा सवालही यानिमित्ताने नागरिकांतून उपस्थित होत आहे.
सातारा जिल्ह्यातील काही जुन्या बसस्थानकामध्ये ढेबेवाडी येथील स्थानकाचा समावेश होतो.मोठे उत्पन्न मिळत असतानाही एसटी महामंडळाचे पूर्वीपासूनच स्थानकातील सुविधांकडे दुर्लक्ष सुरू आहे.पाठीमागील बाजूला वाढलेल्या गवत व झुडपांमुळे सापांचा संचार,उघड्यावर कचरा टाकण्यामुळे पसरलेली दुर्गनधी,पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेचा अभाव अशा अनेक गैरसोयीमुळे हैराण असलेल्या स्थानकात सुरक्षेचेही बारा वाजले आहेत.
घटना घडल्यावर तेवढ्या पुरतीच वॉचमन, सीसीटीव्हीची चर्चा होत. स्थानकात उभ्या मुक्कामी बसच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून चोरट्यानी डिझेल चोरीचा प्रयत्न केला मात्र चालक-वाहकाला जाग आल्याचे लक्षात आल्यानंतर टाकीत सोडलेली रबरी पाईप व डिझेलने भरलेले कॅन तेथेच टाकून चोरट्यांना पळ काढावा लागला. या प्रकरणातून तरी एसटी महामंडळाने काही बोध घेवून जागे व्हावे सुरक्षेचे उपाय करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’