पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | 17 तारखेला चिखलठाणा पोलिस स्टेशन येथे चितेगाव शिवारातील बीपीसीएल पेट्रोल पंपावरून 3 लाख 45 रुपये किमतीचे 3480 लिटर डिझेल कोणीतरी चोरट्याने पळवले असा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळून 12 जणांना पकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस आणून 98 लाख 49 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांचे गुप्‍त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण आधारित माहिती मिळताच हा गुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील लक्ष्मीपेढि, तेरखेडा तालुका वाशी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार रामा पवार आणि त्यांच्या साथीदारांनी केला असल्याचे उघड झाले.

ही टोळी गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातून वाळू भरून ती वाळू उस्मानाबाद जिल्ह्यात विक्री करते. सदर वाळू वाहतुकीच्या ट्रकमध्ये ही टोळी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर जाऊन रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावरील डिझेलच्या टाकीतून प्लॅस्टिकच्या हातपंपाच्या साह्याने डिझेलची चोरी करून ते डिझेल त्यांच्याजवळील वाळू वाहतुकीच्या ट्रक मध्ये टाकून उरलेली डिझेल हे त्यांचे ओळखीचे ट्रक चालक आणि मालक यांना स्वस्त दरात विक्री करत असत अशी खात्रीलायक माहिती मिळताच क्षणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड तालुक्यातील शिवराई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर नवीन टोलनाक्याजवळ सापळा रचून गुजरात कडून वाळू भरून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली. यावेळी त्या ट्रेकमध्ये प्लास्टिकच्या अंदाजे 35 ते 40 लिटर क्षमतेच्या वेगवेगळ्या रंगाच्या डिझेलचा कॅन दिसून आल्या. त्यामध्ये 45 भरलेल्या कॅन आणि 40 रिकाम्या कॅन देखील मिळाल्या. याबद्दल ट्रक वरील व्यक्तींना विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या कॅन मधील डिझेल हे चितेगाव पंपावरून चोरले असल्याची कबुली दिली.

या संपूर्ण कारवाई मधून 4 ट्रक, 1540 लिटर डिझेल, 3 डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारे हँडपंप, 220 फूट छोटा बांगडी पाईप ,42700 रुपये रोख रक्कम आणि 8 मोबाइल असा एकूण 98,49,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले टोळी प्रमुख आरोपी रामा पवार यांच्या विरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात दरोडा, घरफोडी आणि चोरी यासारखे एकूण 27 मालाविरुद्धचे गुन्हे दाखल असून इतर आरोपी विरुद्ध देखील अनेक मालाविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपीकडून आणखीही डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे असे देखील त्या म्हणाल्या आणि ही सर्व कारवाई केलेल्या गुन्हे शाखेला 35000 रुपयाचे बक्षीस देखील जाहीर केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment