महामार्गावर डिझेल चोरी : भुईज पोलिसांकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त व एकजण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई | पुणे- बंगळूर महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनातून डिझेल चोरणारी टोळी भुईंज पोलिसांनी 48 तासात जेरबंद करून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयीत दिपक विलास यादव (वय- 25 रा. पांडे ता. वाई) या आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी फरारी आहेत. त्याच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. याबाबतची माहिती भुईंज पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे-खराडे व भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांनी ही माहिती दिली. गुरूवारी दि. 2 सप्टेंबर रोजी रात्री तीनच्या दरम्यान महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत आयशर टेम्पो क्रमांक (एमएच 43 बीपी 9010) हा पार्क केला होता. त्यातून 80 लिटर डिझेल चोरी झाले होते. त्याची फिर्याद टेम्पो चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

या फिर्यादीवरून गुन्ह्याच्या तपासासाठी भुईंज पोलिसांनी घटनास्थळ व ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोधाशोध करून संशयीत आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. यातील मुख्य आरोपी व त्याचा सहकारी अंधाराचा फायदा घेवून पळून गेला असला तरी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली व संशयीत आरोपी दिपक यादव याला अटक करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील, वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे-खराडे व सपोनि आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास गंगावणे, विजय देशमुख, चंद्रकांत मुंगसे, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय धायगुडे पाटील, माणिक कोळपे, संजय उर्फ बापूसाहेब वाघ, रवि वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर, अतुल आवळे, काशिनाथ धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment