हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Digital ID For Home । आतापर्यंत आपण आधार कार्ड वापरत आलोय. आजकाल आधार कार्ड हीच माणसाची खरी ओळख बनलीय. कुठेही कसलंही सरकारी काम असलं कि सगळ्यात आधी तुमचं आधार कार्ड बघितलं जातं. आता केंद्र सरकार आधार कार्डच्या पुढच्या स्टेपच्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण स्वतःच्या आयडी प्रमाणे आता घराचा पत्ताही डिजिटल होणार आहे. येत्या काळात केंद्र सरकारकडून आणखी एक डिजिटल आयडी वापरात आणलं जाणार आहे, हे आयडी कार्ड घराची ओळख ठरेल. घरे आणि ठिकाणे अधिक अचूक आणि जलद शोधण्यास मदत करणे हाच या डिजिटल आयडीचा उद्देश आहे. यामुळे पत्त्याशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण होईल, जसे की चुकीचे पत्ते, डिलिव्हरीतील अडचणी, आणि सरकारी सेवांमधील विलंब.
प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं या प्रणालीसाठीची (Digital ID For Home) तयारी सुरू असून डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्सवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच्याशीच संबंधित एक मसुदा सामान्यांकडून काही सल्ले आणि मार्गदर्शनपर पर्याय मागवण्यासाठी जारीसुद्धा केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या तरी भारतात घराच्या पत्त्याचा डेटा व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम अशी सिस्टीम नाही. ज्यामुळे अकार्यक्षमता आणि संभाव्य गैरवापर होतोय. , खाजगी कंपन्या अनेकदा संमतीशिवाय वैयक्तिक पत्त्याची माहिती गोळा करतात आणि शेअर करतात. मात्र आता नवीन डिजिटल आयडी मुळे या गोष्टीना आळा बसेल. हा आयडी एक प्रकारे घराचाच आधार क्रमांक असेल असं म्हणायला हरकत नाही. या तंत्राच्या माध्यमातून देशातील कोणत्याही पत्त्याचा क्षणात ठावठिकाणा मिळू शकेल आणि ही संपूर्ण प्रक्रिया डिजीटल माध्यमातून केली जाईल.
मुख्य वैशिष्ट्ये : Digital ID For Home
प्रत्येक घराला किंवा मालमत्तेला एक युनिक डिजिटल कोड मिळेल, जो QR कोड, बारकोड, किंवा डिजिटल क्रमांकाच्या स्वरूपात असू शकतो.
डिलिव्हरी सेवा (ई-कॉमर्स, पोस्टल सेवा), आपत्कालीन सेवा (पोलीस, रुग्णवाहिका), आणि सरकारी योजनांसाठी पत्त्याची पडताळणी जलद होईल.
चुकीच्या पत्त्यांमुळे होणारा ₹10-14 अब्ज वार्षिक तोटा कमी होईल, खास करून ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात.




