दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; हात फ्रॅक्चर तर पाय आणि पाठीला गंभीर दुखापत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घरातच पाय घसरून पडल्याने वळसे पाटील यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे तर पाय आणि पाठीला जबर मार बसला आहे. यामुळे आता त्यांना उपचारासाठी पुण्यातील औंध येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या वळसे पाटील यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना पुढील काही दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः वळसे पाटील यांनी ट्विट करून दिली आहे.

नुकत्याच सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, “काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.” दरम्यान, या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे. अशातच त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

सांगितले जात आहे की, बुधवारी रात्रीच्या वेळी अंधारात लाईट सुरु करायला जात असताना वळसे पाटील घरात पाय घसरून पडले. यात त्यांच्या हातापायाला आणि पाठीला जबर दुखापत झाली. यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी वळसे पाटील यांचा हात फॅक्चर झाला असल्याचे कुटुंबाला सांगितले. त्यामुळे आता पुढील काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत. याकाळात ते लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाची कामे घरून पार पडतील.