अवैद्य धंद्यांना बसणार चाप, गृह राज्यमंत्र्यांचे पोलीसांना सरप्राइज चेकिंगचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद झाले आहे की नाही ते पाहणे. तसेच शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळा येथे विशेषतः मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांमार्फत सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.

ग्रामीण भागातील असामाजिक तत्वांवर कारवाई न केल्याचे या अचानक भेटीत (सरप्राइज चेकिंगमध्ये) आढळून आल्यास तेथील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील अवैध व्यवसाय तसेच असामाजिक तत्वांविरुद्ध नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व या तक्रारींची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.

Leave a Comment