पुन्हा निराशा ! औरंगाबादची पीटलाईन जालन्याला पळवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रेल्वेची पीटलाईन अखेर जालन्याला पळविण्यात आली आहे. पीटलाईन जालन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केली.

औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे कामही रेल्वेने हाती घेतले. मात्र चिकलठाण्यात रेल्वेची जागा अपुरी आहे. राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याच वेळी जालन्यातही जागेची पाहणी झाली. त्यामुळे पीटलाईन जालन्याला जाण्याचे संकेत मिळाले होते. अखेर जालना रेल्वे स्टेशनवर 100 कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा दानवे यांनी केली.

औरंगाबादेत 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी पीटलाईनसाठी औरंगाबादेत महिनाभरात जागा शोधण्याची जबाबदारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर सोपवली होती. द. म. रेल्वेच्या मुख्यालयाकडून 2017 मध्ये पीटलाईनला मंजुरी मिळाली होती. परंतु ती पुढे विविध कारणांनी अडविली गेली. संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात औरंगाबाद हे एक मोठे शहर आहे. पीटलाईनसाठीचे सर्व निकष औरंगाबाद पूर्ण करते. तसेच पीटलाईन नसल्यामुळे औरंगाबादहून नव्या रेल्वेगाड्या सुरू होण्यास अडचणी येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. आता जालन्याला पीटलाईन होणार असल्याने जालन्याहूनच नव्या रेल्वे सुरू होतील.

Leave a Comment