सावधान ! जायकवाडीतून कुठल्याही क्षणी होऊ शकतो पाण्याचा विसर्ग

औरंगाबाद – मराठवाड्याची तहान भागवणारे पैठण येथील जायकवाडी धरण सध्या 85 टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रातून येव्यामध्ये वाढ झाल्यानंतर कुठल्याही क्षणी गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर व हवामान विभागाच्या पुढील आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा या अनुषंगाने सद्यस्थितीत पूरनियंत्रण यंत्रणा अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या वर्षीची रेकॉर्डब्रेक 82 हजार 550 क्‍युसेकने नोंदवली गेली. तर सध्या 64 हजार 653 क्‍युसेकने धरणात आवक सुरू आहे.

सध्या जायकवाडी धरण 85 टक्के भरलेले असल्याने पाणलोट क्षेत्रात येव्यामध्ये वाढ झाल्यानंतर कुठल्याही क्षणी विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडावा लागू शकतो. तसेच धरणाच्या निम्न बाजूचे गोदावरी नदीवरील सर्वोच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये सुद्धा 100 टक्‍क्‍यांच्या जवळपास जलसाठा झाला आहे या अनुषंगाने पूरनियंत्रण यंत्रणांना अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे पत्र जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सुनील चव्हाण यांना लिहिले आहे.

तसेच या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जालना, परभणी, अहमदनगर, बीड आदी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पूर नियंत्रक विषयी उपाययोजना करण्याबाबत सतर्क करणारे पत्र लिहिले आहे.