सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
राज्यातील आश्रम शाळा ह्या आदर्श असल्या पाहिजेत मात्र काही आश्रम शाळेत विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत, याच विकृत मनोवृत्तींना चाप लावण्यासाठी शिक्षा तात्काळ होण्याची गरज आहे. पोक्सो कायद्याची अंमलबजावणी आता कडकपणे सुरु झाली आहे. विकृत मनोवृत्ती बदलण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केली.
राज्य महिला आयोगाच्या ”प्रज्वला” योजनेची माहिती देण्यासाठी रहाटकर सांगली जिल्ह्याच्या ३ दिवसाच्या दौऱ्यावर आल्या असून त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या, ‘लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृतांना खडसावून जाब विचारण्यासाठी समाजानेही पुढाकार घेतला पाहिजे. पायल तडवी प्रकरणात पोलिसाना गुन्हे दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार ते दाखल झाले आहेत. याबाबत प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत याची चौकशी करून त्यावर महिला अयोग लक्ष ठेवत आहे.
चांगल्या विचाराने आश्रमशाळा देण्यात आल्या होत्या. परंतु ज्या विचाराने त्या देण्यात आल्या होत्या तो विचार दिसत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आयोगाने पंढरपूर पालखी मार्गावरून महिलांच्या कायद्याची, त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती देणारे सुसज्ज चित्ररथ दोन्ही बाजूला लावले आहेत. कीर्तन, पोवाडा भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. बचतगटांची चळवळ आता जोर धरत आहे. संघटित होऊन काम करणे याचा उद्देश आहे. मुद्राच्या माध्यमातून महिलांना १ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते असेही त्या म्हणाल्या. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, नगरसेविका भारती दिगडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर हे उपस्थित होते.