सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साता-यातील नामवंत कूपर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम सी. एस. आर. अंतर्गत आयोजित केले जातात. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत नाताळ सणांच्या व नववर्षाच्या निमित्ताने कूपर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 200 ब्लॅकेटचे वाटप काल रात्री साता-यातील गरिब व निराश्रितांना केले गेले.
सातारा शहरात थंडीच्या गारव्यात कुडकुडणा-या गरिब व निराश्रितांना उब मिळाली. शहरातील बसस्थानक, पोवई नाका, राजवाडा बसस्थानक, विसावा नाका, गोडोली नाका यासह शहरातील विविध ठिकाणी निराश्रितांना ऊब देण्याचे काम केले. यावेळी कूपर कॉर्पोरेशनच्या संचालिका अॅड. मनिषा कूपर यांच्या हस्ते सातारा बसस्थानक परिसर, स्व. कांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा व राजपथ येथे ब्लॅकेटचे गरजूंना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात कूपर उद्योग समुहाचे मनुष्यबळ विभाग प्रमुख नितीन देशपांडे, वित्त विभाग प्रमुख राजेश देशपांडे, श्रीमती फ्रेया दास, वहिष्ठा दास, तोहीद पटेल, भुषण मोहिते, विकास सावंत व इतर कर्मचारी सहभागी झाले.