Wednesday, June 7, 2023

आधी मंदिर स्वच्छता ते आता थेट अन्नधान्य वाटप; मुस्लिम समुदायाने जपली अनोखी बांधिलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. कराड तालुक्यातील दक्षिण मांड नदीच्या काठी वसलेल्या काले या गावात अचानक महापूर आला आणि कालेकरांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्वभूमीवर गावातील मुस्लिम समाजाकडून गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.

काले गावातील मुस्लिम समाजाकडून तब्बल 50 पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. अल्ताफ हरुण मुल्ला, इक्बाल बंडू मुल्ला, सादिक मुल्ला तसेच अन्य मुस्लिम बांधवांकडून या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. येवडच नव्हे तर काले गावातून लग्न होऊन सासरी गेलेल्या काही भगिनींनी देखील आपल्या माहेरगाव असलेल्या काले गावातील पूरग्रस्त नागरिकांना मदत केली.

यावेळी अमरदीप वाकडे( तहसीलदार कराड तालुका), दयानंद पाटील( कृष्णा कारखाना संचालक) , तलाठी टी. के. मुल्ला आणि पारस पाटील( ग्रामपंचायत सदस्य) तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी देखील मुस्लिम बांधवांनी काल्यातील शंभो महादेवाचे मंदिर स्वच्छ करत अनोखी बांधीलकी जपली होती. आणि आता अन्नधान्य वाटप करत पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.