कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तब्बल मध्यम व तीव्र कुपोषित 925 चिमुकल्यांना नुकतेच पोषण पोटलीचे वाटप करण्यात आले. अन्नदा संस्था ठाणे, महिला विकास व शिशू संस्कार केंद्र मुंबई, ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या माध्यमातून कराड तालुका पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील मध्यम व तीव्र कुपोषित बालकांना खाऊ व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
कराड येथे पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी कराड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, अन्नदा संस्थेचे संजय मिश्रा, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, महिला विकास व शिशू केंद्राचे जयवंत पाटील, एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अवेळी शशिकांत शिंदे म्हणाले, कराड तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या माध्यमातून तीव्र व मध्यम कमी वजनाच्या बालकांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच संजय मिश्रा म्हणाले, अन्नदा संस्था ही देशाच्या वेगवेगळ्या भौगोलिक आणि दुर्गम भागात, आयसीडीएस बरोबर आणि लोकल एनजीओ सोबत पर्टनेरशिप करून गरजू लाभार्थीना “कुपोषण मुक्त करणे” आणि “कोणी ही उपसी झोपू नये” या उद्देशाने करत काम करत आहे.
यावेळी जयवंत पाटील यांनी महिला विकास व शिशू केंद्राच्या उपक्रमांची माहिती दिली. आनंदा थोरात यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका पी.पी.पाटील यांनी सुत्रसंचालन केले. यु.आर.वावरे यांनी आभार मानले.
पोटलीमध्ये आहे ‘या’ गोष्टी
चिमुकल्यांचे देण्यात आलेल्या अन्नदा पोषण पोटलीमध्ये अनेक प्रकारच्या पौष्टिक खाद्य पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सूक्ष्म पोषकतत्व युक्त लाडू, ३ प्रकारचे रेडी टु कूक पौष्टिक खिचडी फूड मिक्स, चिक्की, राजगिरा खजूर रोल, राजगिरा लाडू, भाजलेले चणे, भाजलेले कडधान्य चे चिवडे, गुळ, ग्लुकोज बिस्कीट, नाचणीची बिस्कीट. तसेच अभ्यासासाठी चित्र पुस्तिका, कलर पेटी, लेखणी साहित्य, मास्क आणि एक स्ट्रिंग बॅग, मार्गदर्शिका पुस्तिका यांचा समावेश आहे.