कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस ज्यांचा आहे, त्यांना आधी दिला जावा. तसेच १८ ते ४४ वयोगटासाठी जी ऑनलाईन प्रक्रिया केली आहे. ती सक्तीची नसावी जेणेकरून सद्या जो लसीकरण केंद्राबाहेर गर्दीचा गोंधळ होत आहे, तो होणार नाही. तसेच लसीकरणाबाबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला, उपजिल्हा रुग्णालयाला, ग्रामीण रुग्णालयाला किती लसीचे डोस दिले आहेत. याची माहिती दररोज सार्वजनिक केली जावी. जेणेकरून लोकांना लसीकरणाबत माहिती मिळेल व प्रशासनाला सुद्धा गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल व योग्य नियोजन करून लसीकरण प्रक्रिया सुद्धा सुरळीत पार पडेल. अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
लसीकरणाच्या नियोजनाबाबत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सुद्धा फोनवरून आ. चव्हाण यांनी चर्चा केली व त्यांनाही लसीकरण सुरळीत होणेबाबत काही सूचना केल्या. या आढावा बैठकीप्रसंगी प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, कराड तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. भरणे, स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश शिंदे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, कराड शहरचे माजी नगरसेवक अशोकराव पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
लसीकरणाबाबत होत असलेला गोंधळ यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याचेही या बैठकीत निदर्शनास आले. जर शासनाकडून लसीकरणाबाबतची योग्य प्रकारची नियमावली तयार करण्यात आली तर सद्या लसीकरण बाबत जो गोंधळ होत आहे तो होणार नाही व लसीकरण होण्याची गती वाढेल. याचबरोबर आ. चव्हाण पुढे म्हणाले कि, दररोज जिल्ह्याला लसीचे किती डोस प्राप्त झाले त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला व शहराला कश्या प्रकारे लसींचे डोस वितरित होईल याची रोजची आकडेवारी सार्वजनिक रित्या प्रसिद्ध झाली पाहिजे. याचसोबत ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भागात जी गावे लसीकरणासाठी दिली आहेत. त्या गावांना त्याच दिवशी लस दिली गेली पाहिजे अश्या सक्त सूचनाही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या.