जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी सोमवारी पार पडल्या. अध्यक्षपदी महा विकास आघाडीचे शिराळाचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्रीताई मदन पाटील यांची बिनविरोध निवड झाली पदाधिकार्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. विकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या संधीचा उपयोग केला जाईल अशी ग्वाही यावेळी नूतन अध्यक्ष व आमदार नाईक, उपाध्यक्ष श्रीमती पाटील यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड पार पडली. जिल्हा बँकेत महाआघाडीचे 17 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा बँक निवडणूकीसाठी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला अध्यक्षपद तर उपाध्यक्ष पद काँग्रेसला मिळणार होते. अध्यक्ष पदासाठी नाईक, विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र गेल्या काही वर्षापासून नाईक यांच्या अध्यक्षपदाला हुलकावणी मिळाली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही नाईक यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शवला होता.

काँग्रेसकडून उपाध्यक्ष पदासाठी जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांचे नाव चर्चेत राहिले. परंतु सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जयश्री पाटील यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी निश्चित केले. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार नाईक यांचा अर्ज भरण्यात आला. नाईक यांना मावळते अध्यक्ष दिलीप पाटील सूचक तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या अर्जाला सूचक म्हणून भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी अनुमोदन दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक करे यांनी दोन्ही पदाधिकार्‍यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

Leave a Comment