सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील 4.18 कोटींच्या घोटाळ्याचीही पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक, मयत संचालकांचे वारसदार व तत्कालीन अधिकारी यांच्यासह 74 जणांवर यापूर्वीच आरोपपत्र निश्र्चित केले आहे. त्यामध्ये काही विद्यमान संचालकांचाही समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या काही विद्यमान संचालकांसह माजी संचालक, मयत संचालकांचे वारसदार व तत्कालीन अधिकाऱ्यांच्या मागे आता पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.
बॅँकेतील 157 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी चौकशी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी यापूर्वीच संबधितांना नोटीस पाठवली आहे. सदरची चौकशी पुन्हा सुरु करणार असल्याचे सांगितलेे. तशीच नोटीस आता आणखी 4.18 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी कोल्हापूरे यांनी संबधितांना पाठवली असून या घोटाळ्याचीही चौकशी सुरु करण्यात येणार असल्याचे नोटीसीत म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात देशातील कोणत्याही न्यायालयाने सिव्हील व क्रिमीनल दाव्यामध्ये दिलेली अंतरिम स्थगितची कालमपर्यादा फक्त सहा महिनेपर्यत राहिल अन्यथा सदरची स्थगिती सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर आपोपाप व्यपगत होईल, असे आदेश दिले आहेत.या कारणांमुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या 4.18 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीवरील स्थगिती उठली. याप्रकरणी चौकशी अधिकारी कोल्हापूर यांनी संबधित आठ जणांना नोटीस बजावली आहे.