सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालक मंडळातील काही नेत्यांच्या कर्जावर 76 कोटींचे राईट ऑफ करण्याचा निर्णय ऑनलाइन सभेत घेण्यात येणार होता. सदरची ऑनलाइन सभा ही आज पार पडणार होती. जिल्हा बँकेच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढून बँकेच्या कार्यालयावर धडक मारण्यात आली.
यावेळी स्वाभिमानाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. बँकेच्या गेटवर मोर्चा आल्यानंतर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने दुसऱ्या गेट मधून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. आक्रमक कार्यकर्त्यांनी बँकेच्या संचालकांना गेटवर अडवून बोंब मारत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी परिसरात तणावाचे मोठे वातावरण झले होते.
यावेळी बँकेचे संचालक विशाल पाटील यांनी आंदोलकांशी भेट घेऊन घोषणाबाजी करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करू नये, शांततेत मार्ग काढुया असे आवाहन केले. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याशी चर्चा केली. कर्जावर राईट ऑफ करण्याचा निर्णय हा रद्द केला असल्याची माहिती यावेळी बँकेच्या अध्यक्षांनी दिली.