37 एकरांमध्ये साकारणार जिल्हा क्रीडा संकुल

औरंगाबाद | राज्याच्या क्रीडा धोरणानुसार शहरालगत चिकलठाण्यामध्ये 27 एकर जागेत भव्य जिल्हा क्रीडा संकुल साकारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 16 कोटी रुपये मंजूर केला असून त्यापैकी 3 कोटी 84 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. कामाचा भूमीपूजन सोहळा रविवार, 27 जून रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्यात चार कामे होणार आहेत. त्यासाठी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. चार कामांमध्ये तार कंपाउंड, बहुउद्देशीय बंदिस्त प्रेक्षागृह, पिण्याच्या पाण्याची विहिर आणि पाण्याच्या टाकीचा समावेश आहे.

क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी 18 मे 2018 रोजी क्रीडा संचालनायास जागेबाबत संमतीपत्र सादर केले होते. त्यानुसार मौजे चिकलठाणा येथील गट क्रमांक 216 मधील 7.07 हेक्टर आणि 217 मधील 7.89 हेक्टर अशी एकत्रित 14.96 हेक्टर गायरान जमीन 1 मार्च 2019 रोजी विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी देऊ केली होती.

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी 6 जानेवारी 2020 रोजी या जागेचा ताबा घेतल्यानंतर नगर विकास विभागाच्या 2 जून 2029 रोजीच्या अधिसूचनेनुसार एकूण 14.96 हेक्टर म्हणजेच 37 एकर क्षेत्र (वीटभट्टी या आरक्षणातून वगळून) ‘जिल्हा क्रीडा संकुल प्रकल्प औरंगाबाद’ या प्रयोजनसाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 (2) अन्वये ही मान्यता दिल्याने संकुलाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील खेळाडूंसाठी हे प्रशस्त क्रीडा संकुल पर्वणी ठरणार आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकाम कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काही तांत्रिक अडचणी पुढे आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव, पदवीधर आणि ग्रामपंचायत निवडणुक आचार संहितेमुळे बांधकामास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या जागेवर वीटभट्टीचे आरक्षण असल्याने ते हटवण्यास बराच कालावधी लोटला. नंतर जागेचा ताबा घेऊन सातबाऱ्यावर जिल्हा क्रीडा संकुलाची नोंद करण्यामध्ये वेळ गेल्यामुळे बांधकामाला उशीर झाला आहे.

संरक्षक भिंत, विविध खेळाची मैदाने, स्केटींग, बास्केटबॉल, मल्टिपर्पज हॉल, जिम हॉल, योगा हॉल, जिम्नॅस्टिक हॉल, टेबल टेनिस हॉल, बॉक्सिंग हॉल, शूटिंग रेंज, धनुर्विद्या, वेटलिफ्टिंग, कुस्ती हॉल, 16 कोर्ट कँटीनसह प्रशस्त बॅडमिंटन हॉल, पाण्याची अंतर्गत सुविधा व टाकी, लॉन टेनिस सिंथेटिक कोर्ट, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, ड्रेनेज व वॉकिंग पाथवे. अंतर्गत 6 रस्ते, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युतीकरण, पार्किंग सुविधा शेड त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार 2, सुरक्षा रक्षकांना प्रशस्त खोल्या, 150 मुला मुलींसाठी वसतिगृह, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा असणार आहेत.