कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या कन्नडीगाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी सज्जड दम दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे अशा शब्दांत माने यांनी फेसबुक पोस्ट शेयर करत कन्नडिगांना ठणकावलं आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कारकर्त्याला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून धैर्यशील माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माने यांच्या जोरदार प्रतिक्रियेनंतर कर्नाटक व्याप्त सीमा भागातील वातावरण चांगलं तापणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
कर्नाटक राज्याला लागून असेलला सीमा भाग गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ असा आशय माने यांनी शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट नमूद केला आहे.
तसंच आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसं सांगावं, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील. पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, असही त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये सांगितलं आहे.