शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नका; मनपाला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिवजयंतीला आठवडा शिल्लक राहिलेला आहे. अशा परिस्थितीत क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाविषयी महापालिकेकडून गोपनीयता बाळगली जात आहे. तसेच पुतळ्याची उंची वाढविल्यामुळे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करता येणार नाही. यासाठी पर्यायी व्यवस्थेचे काय नियोजन करण्यात आले आहे, याविषयी सस्पेन्स ठेवण्यात येत आहे. हा सस्पेन्स किती दिवस ठेवणार आहात असा सवाल करून शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची व चबुतऱ्याची उंची वाढवावी ही शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर कसे तरी घाई करून यावेळेस स्मारकाचे काम पूर्ण केले व पुतळादेखील बसविण्यात आला. आता प्रश्न आहे तो पुतळ्याच्या अनावरणाचा. तो कुणाच्या हस्ते करायचा व कधी करायचा. शिवप्रेमींची काय इच्छा आहे, त्यांची काय मागणी आहे. महापालिकेचे काय नियोजन आहे. यावर महापालिका प्रशासक काहीही बोलायला तयार नाहीत. महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांना जाब विचारायला कुणीच नाही म्हणून प्रशासक मनमानी करत असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे.

शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विश्वासात घ्यायला तयार नाहीत. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला महापालिकेचे काय नियोजन आहे हे स्पष्ट करावे असे म्हटले आहे. महापालिका प्रशासकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना अथवा शिवप्रेमींना त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल सांगावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, समिती अध्यक्ष अभिजित देशमुख, प्रा. मनोज पाटील, अनिल मानकापे, राजेंद्र दाते पाटील, अप्पासाहेब कुढेकर, मच्छिंद्र देवकर, सुनील औटे, महेश उबाळे, अनिल बोरसे, संदीप शेळके, विशाल दाभाडे यांनी केले आहे.

Leave a Comment