Sunday, June 4, 2023

डॉक्टरी पेशाला काळीमा ! डॉक्टरने दारू पिऊन 50 वर्षीय महिलेसोबत रुग्णालयात केले ‘हे’ कृत्य

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये डॉक्टरच्या पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 50 वर्षीय महिलेसोबत डॉक्टरने अश्लील वर्तन केले आहे. बीडच्या नेकनूर या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या नराधम डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बीड तालुक्यातील नेकनूर येथील कुटीर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या महिलेला तपासणी करण्याच्या बहाण्याने घेऊन जात आतून कडी लावून अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ.अशोक बांगर असे आहे. त्याने दारूच्या नशेत हे दुष्कृत्य केले आहे. या महिलेने तिच्या सोबत घडलेला प्रकार वैद्यकीय अधीक्षक डॉ शिंदे यांना सांगितला. यानंतर या महिलेने आरोपी डॉक्टराविरोधात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार केली असल्याचे डॉक्टर शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी देखील या डॉक्टरने दारू पिऊन अनेक महिलांसोबत गैरवर्तन केले होते. मात्र आपली बदनामी होईल या भीतीने महिला पुढे आल्या नाहीत. तर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि परिचारक यांच्यामध्ये देखील या डॉक्टराची दहशत आहे. आरोपी डॉ.अशोक बांगर हे कंत्राटी तत्वावर नेकनूरच्या कुटीर आणि स्त्री रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहेत. पीडित महिला पायाला खाज सुटली म्हणून डॉ.बांगर यांच्याकडे उपचारासाठी आली होती. त्यावेळी डॉ.बांगर याने या महिलेला तपासणीच्या बहाण्याने रूममध्ये नेले तसेच रूमची कडी लावून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. यानंतर या पीडित महिलेने याबाबतची तक्रार वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिंदे यांच्याकडे केली. यानंतर डॉ . शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे या प्रकरणाचा अहवाल पाठवला आहे. या आरोपी डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी या पीडित महिलेने केली आहे.