एकंदरीत आढावा घेतला असता डॉनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात तितकी चांगली झाली नव्हती. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून १९ धावा केल्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला डच्चू देण्यात आला होता. तिसऱ्या कसोटीत मात्र एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे डॉनला संधी मिळाली आणि याच संधीचे त्याने सोने केले. या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक केले अन हे त्याचे सर्वात कमी वयातील शतक होते. या मालिकेत ऑस्ट्रेलिया सपाटून मार खात होती, पण डॉन त्याची खेळी सुधारतच निघाला होता. ठराविक कालावधीने संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे आले. कर्णधारपदानंतरच्या काही सामन्यात त्याचा खेळ अपेक्षेप्रमाणे होत नव्हता. त्यावेळत्याने कर्णधारपद सोडावं, अशाही सूचना देण्यात आल्या. पण नेहमीप्रमाणे शांत राहत त्याने यावरही मार्ग काढला. भारताविरुद्ध त्याने खेळलेल्या ५ सामन्यांत ७१५ धावा काढल्या. आणि याच दौऱ्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या शतकांच शतकही पूर्ण केलं. एखाद्या ब्रिटिश खेळाडूंव्यतिरिक्त असं करणारा तो पहिलाच फलंदाज होता. उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी त्याने खास लांब दांडा असलेल्या उंची बॅट बनवून घेतल्या होत्या. निवृत्तीपर्यंत त्याच्या नावावर तब्बल २ डझन विश्वविक्रमांची नोंद झाली होती. ज्यातील बरेच अजून अबाधित असून, जे मोडले गेले त्यालाही बराच कालावधी जावा लागला.
इंग्लंड संघाविरुद्ध त्याने सर्वाधिक ५०२८ धावा काढल्या. कोणत्याही एका संघाविरुद्ध इतक्या धावा करणं अजूनही कुणाला शक्य झालं नाही. १९३८ हे साल त्याच्यासाठी सर्वाधिक सातत्याच ठरलं. याशिवाय १९३९-४० लाही डॉनने धावांचा रतीब घातला. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड संघाचा पराभव डॉन ब्रॅडमनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने केला आणि द इनव्हिन्सीबल अशी आपली ओळख निर्माण केली. १९४० ला रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सलाही तो रुजु झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांना कामाच्या विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यावेळी त्याची नेमणूक व्हिक्टोरिया प्रांतातील एका सैनिकी शाळेत शारीरिक शिक्षण देण्यासाठी झाली. पुढे १९४५ साली झालेल्या दुखपतीत त्याच्या एका बोटाची संवेदना कमी झाली त्यामुळे तेथील कामावरही परिणाम झाला. तरीही त्याच्या खेळावरील प्रेमापोटी आणि कामातील निष्ठेमुळे ऑस्ट्रेलियन नियामक मंडळाने त्याचा करार सुरू ठेवला. पुढे १९४८ साली इंग्लंडविरुद्धच शेवटची कसोटी खेळून तो निवृत्त झाला.
एकूण खेळविश्वाचा आढावा घेतला असता, सर्व क्रीडा प्रकारांत उठावदर्शक असं काम डोनाल्ड ब्रॅडमन याने केलं होतं. त्याची फलंदाजीतील ९९.९४ ही सरासरी केवळ अशक्यप्राय गोष्ट मानली जाते. १९४८ सालीच ब्रिटिश जनतेत विन्स्टन चर्चिल इतकी लोकप्रियता मिळवणारा तो पहिला परदेशी व्यक्ती होता. इतर लोकप्रिय खेळाडूंच्या स्टँडर्ड डेव्हिएशनशी तुलना केली असता डॉन हा ब्राझीलच्या फुटबॉलपटू पेलेंपेक्षा कितीतरी आघाडीवर होता. त्याच्या आयुष्यतील पुढच्या प्रवासात त्याने प्रशासक म्हणून उत्तम भूमिका बजावली. सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न हे त्याचे आवडते खेळाडू राहिले. २००० साली न्यूमोनिया झाल्याने त्याची तब्येत खालवली आणि यातच फेब्रुवारी २००१ साली त्याचं निधन झालं. १९९६ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या हॉल ऑफ फेममध्ये, २००० साली शतकातील सर्वोत्तम विस्डेन खेळाडू आणि २००९ साली आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मधील खेळाडू म्हणून डॉन ब्रॅडमनची निवड केली गेली. त्याच्या मृत्यूपूर्वी ३ वर्ष आधीच त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट ऑस्ट्रेलिया सरकारने काढले होते. त्याच्या नावाने गौरवल जाणं हेही कित्येकांना अभिमानास्पद वाटतं. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह वॉने श्रीलांकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला गोलंदाजीतील डॉन ब्रॅडमन म्हणून गौरविले. डॉन ब्रॅडमनवर गाणी आणि चरित्रपटही निघाले. तसेच भव्यदिव्य असे संग्रहालयही उभारण्यात आले.
भारतासारख्या देशातील सचिन तेंडुलकरनामक खेळाडू ज्यावेळी अब्जावधी लोकांच्या गळ्यातील ताईत होतो, तेव्हा त्याच्या प्रेरणास्थानाला जाणून घेऊन लोकांसमोर मांडण्यातही वेगळीच मज्जा आहे. देशोदेशीच्या सीमा ओलांडून खेळभावनेने एकत्र यायला शिकवणाऱ्या अन त्यानिमित्ताने प्रेरणास्थान बनलेल्या सर डॉन ब्रॅडमन यांना ११० व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक सदिच्छा