ओमिक्राॅन व्हायरसबाबत समाज माध्यमात येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

नव्याने येत असलेल्या ओमिक्राॅन व्हायरस बाबतीत समाज माध्यमात बऱ्याचशा उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावर राज्य सरकारचे बारकाईने लक्ष आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी व्हिडिअो काॅन्फरन्स घेतलेली आहे. त्यांनी टास्कफोर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे. या व्हायरस बाबत ज्या बाबी समोर येतायत त्याच्यावर बारीक लक्ष सरकारचे आहे. तेव्हा समाज माध्यमात येणाऱ्या बातम्यावर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, परदेशातून विषेशतः अफ्रिकन देशातून जे काही लोक भारतात येत आहेत. त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना विमानतळ प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांना दिलेल्या आहेत. ओमिक्राॅन व्हायरस बाबत समाजमाध्यमात येणाऱ्या बातम्यावर जनतेने विश्वास ठेवू नये. जी वस्तूस्थिती जिल्ह्यामध्ये असेल ती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सांगितली जाईल. लोकांनी घाबरून जाण्यासारखे काहीही कारण नाही.

ओमिक्राॅन व्हायरस बाबत ज्या सूचना व उपाययोजना करायचा आहेत, त्यासाठी राज्य सरकार सतर्क आहे. राज्य सरकारने नेहमीच जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिलेले आहे. कुणीही घाबरून जायचे काही कारण नाही. समाज माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या बाबींवर विश्वास ठेवू नये, याबाबत अधिकृतपणे जिल्हाधिकाऱ्यामार्फत जिल्ह्यातील जनतेला अवगत केली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.