सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा तालुक्यातील महागाव येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीत जखमीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्यांवरही खूनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सात जणांवर मारामारी, जबरी चोरी तर सहा जणांवर खूनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये अमित चव्हाण, आशिष चव्हाण, रविराज चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजिंक्य चव्हाण, मेहल मोरे व सतिश नामदेव चव्हाण (सर्व रा. महागाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत साहिल अनिल चव्हाण (वय 21, रा. महागाव) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी घरात घुसून मला व दाजी मनोज धनवडे यांना काठी व पाईपने मारहाण केली. जखमी झाल्याने दवाखान्यात निघाल्यावर गाडीच्या काचा फोडल्या तसेच भांडण सोडवायला आलेल्या राजेंद्र चव्हाण यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून लंपास केला.
दुसरी तक्रार प्रकाश शंकर चव्हाण (रा. महागाव, ता. सातारा) यांनी दिली आहे. त्यानुसार अमित चव्हाण, आशिष चव्हाण, संतोष चव्हाण, अर्जुन चव्हाण, मेहुल मोरे व सतिश नामदेव चव्हाण यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास संशयितांनी साहिल साहिल चव्हाण याला जुन्या भांडणाच्या कारणावरुन मारहाण केली. जखमीला उपचारासाठी घेऊन जात असताना संशयितांनी मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याचे प्रकाश यांनी तक्रारीत म्हटले आहे.