दुहेरी खूनप्रकरण : पत्नीसह अन्य एका महिलेचा खून करणारा फरार संशयित कर्नाटकातून ताब्यात

0
22
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई | वाई तालुक्यातील भुईंज येथून बेपत्ता विवाहितेच्या खूनप्रकणातील आरोपीला 24 तासांत अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात नितीन आनंदराव गोळे (वय- 38, रा. व्याहळी, ता. वाई ) असे संशयितांचे नाव आहे. त्याला बेळगाव येथून अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान आरोपीने स्वतःची पत्नी मनीषा नितीन गोळे (वय- 34, रा. व्याजवाडी) हिचा दि. 1 मे 2019 रोजी खून करून स्वतःच पत्नीच्या मिसिंगची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. तिचा मृतदेह डोंगर परिसरात पुरून टाकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. त्याचबरोबर संध्या शिंदे हिचा देखील गळा आवळून खून केल्याचीहि कबुली दिल्याने भुईज पोलिसांसह वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वाई तालुक्यातीलच धोम येथील डाॅ. संतोष पोळ याने ज्या पध्दतीने महिलांचे खून केले होते. त्याच पध्दतीने व्याहळी व व्याजवाडी हद्दीत राहणा-या नितीन गोळे याने दोन महिलांचा खुनाची कबुली दिली आहे. भुईज येथून बेपत्ता झालेल्या विवाहीतेचा खून झाल्याची फिर्याद आल्यावर भुईज पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. त्यानंतर 24 तासात गुन्हा उघडकीस आणण्यात भुईज पोलीसांना यश आले. भुईजचे सपोनी अशिष कांबळे व त्यांच्या सहका-यांनी या दुहेरी महिलांच्या खुनाला वाचा फोडल्याने त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे भुईज पोलिसांचे अभिनंदन केले. याबाबत अधिक माहिती भुईज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आशिष कांबळे म्हणाले, दि. 31 जुलै रोजी रात्री 10 वाजता सातारा येथून बेपत्ता झालेल्या संध्या विजय शिंदे (वय- 34 रा. कारी, ता.जि. सातारा) या बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. दरम्यान मंगळवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसले (ता. वाई) येथील ऊसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधारकार्ड व इतर कागदपत्रे यांची पडताळणी केली. त्यानंतर सदर मृतदेह हा संध्या शिंदे हिचा असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठविला. मृतदेहाचे बांधलेले हात आणि तोंडावरील जखमांवरून हा खूनच असावा असा प्राथमिक अंदाज बांधून सपोनि कांबळे यांनी घटनास्थळा पासून तपासाला सुरुवात केली. मोबाईल लोकेशनच्या आधारावर संशयितापर्यंत पोहचण्यासाठी विशेष पथक रवाना केले.

बुधवारी सकाळी कारी (ता. जि.सातारा) येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांनी भुईज पोलीस ठाण्यात येवून संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे (रा. व्याहळी, ता. वाई) यांनीच केला असल्याची फिर्याद दिली. तेव्हा नातेवाईकांनी पोलिसांना तातडीने संशयित आरोपीला अटक करा अशी मागणी केली. यावरून भुईज पोलीसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. परंतु तो सापडत नव्हता. त्यासाठी स.पो.नि. आशिष कांबळे, डी. बी.पथकातील रविराज वर्णेकर, प्रसाद दुधस्कर, तुकाराम पवार, अतुल आवळे, शिवाजी तोरडमल, आनंदराव भोसले,बापूराव धायगुडे, प्रियांका कदम, दिपाली गिरी गोसावी, सातारा एल.सी.बी.चे स.पो.नि. रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तमराव दबडे, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, रवी वाघमारे, सचिन ससाणे या सर्वानी शोधकार्य सुरू केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे या टीमने फरार आरोपी असलेला नितीन गोळेच्या शोधासाठी वैराटगड पायथ्याशी असलेला डोंगरद-या परिसर रात्रंदिवस फिरून शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अपयश आले होते.

संशयित आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन थेट कर्नाटकातील बेळगाव परिसरात पसार झाल्याची माहिती सपोनि आशिष कांबळे यांना दिनांक 9 ऑगस्ट रोजी मिळाली होती. त्यांनी स्वतः सहकाऱ्यांसोबत बेळगाव येथे सापळा रचून मंगळवारी दि. 10 रोजी 5 वाजणेच्या सुमारास अटक केली. त्याला भुईंज पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक करून त्याच्यावर दोन महिलांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मयत संध्या शिंदे व त्याची स्वतःची पत्नी मनीषा नितीन गोळे (वय- 35 वर्षे, रा. व्याजवाड़ी) हिचा देखील दि. 1 मे 2019 रोजी खून करून तिचाही मृतदेह त्याने पुरुन टाकल्याची कबुली भुईंज पोलिसांना दिली आहे. आरोपीस दि. 12 रोजी वाईच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here