सांगली प्रतिनिधी । तासगाव तालुक्यातील वायफळे येथील द्राक्षबागांवर डाऊनी या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. गावातील उदय उर्फ बबलू पाटील यांची सुपर व माणिकचमन या जातीची द्राक्षे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डाऊनीच्या प्रदर्भावामुळे अक्षरशः घड फेकून देण्याची वेळ पाटील यांच्यावर आली आहे. नैसर्गिक आघातामुळे या परिसरातील द्राक्षबागायतदार मेटाकुटीला आले आहेत.
यावर्षी तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. फुलोरा अवस्थेतील अनेक बागांची गळ, कुज झाली आहे. यातून ज्या शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून जिद्दीने बागा वाचवल्या त्या बागांवर आता डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा रोग पानांवर आणि आता थेट घडांवर आल्याने हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे.
वायफळे येथील उदय उर्फ बबलू पाटील यांनी शेकडो किलो द्राक्षे अक्षरशः फेकून दिली आहेत. त्यांचे यातून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आधार देऊन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.