डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीचे तत्वनिष्ठ लोक राजकारणात यावेत – डॉ. श्रीमंत कोकाटे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | बाबासाहेब यांचे कार्य अफाट आहे. धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन देशाला आणि जगाला अभिमान वाटेल असे कार्य बाबासाहेब यांनी केले आहे. अज्ञान, दारिद्र्य, धर्मकांड,जातीभेद,यातून लोक मुक्त व्हावेत यासाठी त्यांनी शिक्षण घेतले. व्यक्तिगत किंवा कौटुंबिक किंवा जातीच्या हितासाठी त्यांनी शिक्षण घेतले नाही. बाबासाहेब यांचे योगदान विविध क्षेत्रात असून ते पत्रकार होते. जलतज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ,राजनीतीज्ञ,शास्त्रज्ञ ,समाज क्रांतीकारक ,परिवर्तनवादी शिक्षणतज्ञ होते. ‘आमुलाग्र परिवर्तनासाठी शिक्षण’ हे त्यांचे ध्येय होते. त्यांची पत्रकारिता अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी होती. ते उत्तम प्राध्यापक असल्याने त्यांची व्याख्याने इतर विषयाचे विद्यार्थी खिडकीतून ऐकत असत. समाजातील भेदभाव, अज्ञान दूर करण्यासाठी व माणुसकीचे हक्क मिळविण्यासाठी आंतरिक तळमळीने त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना ओळखले होते. त्यांनी आंबेडकर हे देशाचे नेते होतील ही अपेक्षा केली होती. ती खरी ठरली. बाबासाहेब सक्रीय राजकारणात उतरले. पिढ्यानपिढ्या ज्या मनुस्मृतीने लोकांची बरबादी केली ती मनुस्मृती त्यांनी जाळली. आज राजकारणात मटन खाऊन आणि पैसे घेऊन मते देणारे मतदार तयार झाले आहेत. पार्ट्या होतात आणि भांडवलदार ,कारखानदार निवडून देतात.हे सगळे चांगले नाही. म्हणूनच बाबासाहेब यांच्या उंचीचे लोक तत्वनिष्ठ लोक राजकारणात आले पाहिजेत असे परखड मत प्रसिद्ध विचारवंत डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी मांडले. ते लुंबिनी संघ सातारा व समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मळोली.ता.माळशिरस जि.सोलापूर या दोन्ही संस्थांनी बहूजन प्रबोधन वर्षानिमित आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य ‘’या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.तसेच सोलापूर येथील शिक्षक संघटनेचे सत्यजित जानराव हे उपस्थित होते.

बाबासाहेब यांच्या सामाजिक योगदानावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, ‘’ गोलमेज परिषदेत त्यांनी सर्वाना मतदानाचे हक्क मिळविले. भारतीय इतिहासात जातीचे विश्लेषण करणारे दोनच व्यक्ती दिसतात ते म्हणजे गौतमबुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर. अनहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ सर्वांनी वाचला पाहिजे. बाबासाहेब यांनी केवळ ग्रंथ लिहिले नाहीत त्यांनी चळवळी उभी केल्या. ते मजूर मंत्री असताना देशात धरणे बांधली. नद्याजोड प्रकल्प योजना बाबासाहेब यांची आहे. १९३८ साली त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोर्चा काढला आहे. ते केवळ दलितांचे मुक्तिदाते नव्हते. विविध क्षेत्रात त्यांनी काम केले आहे . ‘शेतकऱ्यांचे बाबासाहेब’ ‘हा धडा पुस्तकात आला पाहिजे. भारतीय राज्य घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते .त्यांनी विचारस्वातंत्र्य दिले. पूर्वीच्या काळी बोलायला बंदी होती. तहकिकाते हिंद या अल्बेरुनीच्या ग्रंथात इथे अन्याय काय होत होते हे कळते. इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे. प्रतापसिंह महाराज यांना दुसऱ्या बाजीरावाने शिकू दिले नाही पण त्यांची आई प्रतापसिंह महाराज यांनापहाटे शिकवायची. घटनेत स्त्रियांना सन्मान मिळालाच पण तृतीय पंथीय असला तरी त्यास देखील स्वातंत्र्य दिले आहे. घटनेने भारत हे एका घराण्याचे राष्ट्र मानले नाही ,धर्मनिरपेक्ष असले तरी धर्माच्या विरोधात संविधान नाही.आज देशात उद्योगांचे राजकारण चालले आहे. घटनेने धर्म स्वातंत्र्य दिले. वेठबिगारी थांबवली ,आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे..आरक्षण हवे आहेच. त्यासाठी सरकारी संस्था टिकल्या पाहिजेत. हिंदू कोड बिल सर्वांनी वाचा. महिलांना देखील घटनेने माणुसकीचे अधिकार दिले. नाहीतर त्या शिक्षित स्त्रिया झाल्या नसत्या. त्यां खुरपायला गेल्या असत्या. दैनदिन जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी मुल्यांची गरज आहे.बाबासाहेब यांनी लाखो अनुयायांना बुद्ध धर्म दिला.बुद्धाच्या उंचीचा मानव पुन्हा या जगात झालेला नाही.

समतावादी ,प्रयत्नवादी असा धम्म त्यांनी दिला. सारा भारत मी बौद्धमय करीन हा त्यांचा निर्धार होता.पण लवकरच त्यांचे निधन झाले. त्यांचे अपूर्ण काम आपण करायचे आहे. बाबासाहेब आजही ग्रंथातून जिवंत आहेत आणि आपल्या सोबत आहेत असे ते म्हणाले.

सोलापूर येथील सत्यजित जानराव म्हणाले की बाबासाहेब सर्वांगाला व्यापून उरले आहेत .भारतीय इतिहास लिहिताना बुद्ध आणि डॉ.आंबेडकर यांचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. बाबासाहेबांना भक्तिवाद मान्य नाही. आपण शासनकर्ती जमात तयार करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी बाबासाहेब यांनी ग्रंथासाठी बांधले घर’ हे गीत सादर केले. रेणू राणी यांनी धम्मपालन गाथा सादर केली.

अध्यक्षीय भाषणात फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रकाश पवार म्हणाले की ‘’६ डिसेंबर हा वेदनादायी दिवस आहे हे अर्धसत्य आहे.नागपूर नंतर मुंबईला बाबासाहेब यांचा धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणार होता.पण त्यांचे महापरिनिर्वाण झाले तरी त्या दिवशीच आचार्य अत्रे आणि दादासाहेब गायकवाड यांनी यांनी हा कार्यक्रम घेतला आहे. या दिवशी देखील अनेकजण बुद्ध झाले.महापरिनिर्वाण दिन हा संकल्प दिन असेल. १९२० ते १९५६ या काळात बाबासाहेब हे सार्वजनिक जीवनात आले. त्यांनी आश्चर्य वाटावे असे योगदान दिले. एक म्हणजे अस्पृश्यता घालविली. सामाजिक समतेचा पाया घातला. दुसरे म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही त्यांनी उभी केली. लाखो लोकांना लढण्याची प्रेरणा दिली. जगात या बद्दल लोकांना प्रचंड अभिमान आहे. आपले काम आता घटना अभ्यास करणे हे असून लोकशाही बळकट करण्यासाठी काम करायला पाहिजे.

राजकारणात निवडून येणारे लोक हे बाबासाहेब,फुले इत्यादीचे नाव सांगून निवडून येतात आणि निवडून आल्यावर त्यांच्या विरोधातील काम करतात. लोकशाहीला तडा देणारे लोक कोणीही असोत ते आपले नाहीत. परवा झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहिता पाळली गेलेली नाही. या विरुद्ध निवडणूक आयोगास आपण विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीवादी राज्यघटना समृद्ध करणे व तिच्या अपेक्षा पूर्ण करणारी नवीन राजकीय चळवळ उभी करण्याचे काम यापुढे करावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लुंबिनी संघाचे अध्यक्ष डॉ .गोरख बनसोडे यांनी प्रास्ताविक केले .प्रा.डॉ धनराज आवळे यांनी प्रमुख वक्ते व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला. प्रा.डॉ वृषाली रणधीर यांनी त्रिसरण व पंचशील घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना पवार यांनी केले. आभार समता प्रतिष्ठान मळोलीचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता पाटील, प्रा.सर्जेराव कांबळे, प्रा.सुखदेव कोल्हे, वैशाली बागाव, प्रा.युवराज खरात,डॉ.दादासाहेब केंगार, डॉ.मोहन शेगर,कमलाकर दावणे , डॉ.दत्तात्रय चवरे, डॉ,दिलीप कांबळे,भास्कर टोणपे,चंद्रहार माने,डी.जे.वाघमारे, डॉ.पूजा अकोटकर,गोवर्धन इंगोले,प्रा.हेरेन्द्र, हौसेराव धुमाळ ,कोमल यमगर, एम.टी.सामंत, महाबोधी पद्माकर ,मोहन भोसले , डॉ.नामदेव तेलोरे, नवनाथ लोंढे,निवृत्ती रोकडे, प्रा.प्रफुल्ल सरगडे , प्रवीणधवराल, प्रा.प्रियांकाकुंभार, डॉ.संतोष जेठीथोर, बी,डी.कांबळे,बाळकृष्ण माने, प्रा.अशोक उघडे,अमोल भोसले, दया जगताप,.उज्ज्वला मोरे,प्रा.मनोहर निकम,डॉ.भरत नाईक ,सम्यक खवळे,प्रा.गुलाबराव अंबपकर इत्यादी मान्यवर व लुंबिनी संघ सातारा व समता प्रतिष्ठान मळोली .ता.माळशिरस या संस्थांचे पदाधिकारी व सदस्य हजर होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment