कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्यास्मृतिदिनानिमित्त सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील रयत संकुलात रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अॅड. रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, अँड. सदानंद चिंगळे, किसनराव पाटील, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, अतुल कदम, रयत बँकेचे चेअरमन पोपटराव पवार उपस्थित होते. अॅड. रविंद्र पवार म्हणाले, रोजंदारीवरील सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून रयत शिक्षण संस्था ठामपणे उभी आहे. कर्मवीर अण्णांनी संकटावर मात करून रयत शिक्षण संस्था उभी केली. आज कोरोना महामारीवर आपण सर्वांनी मात करून उभे राहूया. रयतेचा व कर्मवीर अण्णांचा विचार या महाविद्यालयाने जोपासला आहे.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले. अॅड. सदानंद चिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, यशवंत विद्यालय, केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल, सदगुरू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, रयत इंग्लिश मिडियम व रयत सेवक बॅंक शाखा कराड या सर्व शाखा प्रमुखांच्या उपस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्या १५० सेवकांना गहू, तांदूळ, साखर व तेल यांचे वाटप करण्यात आले.