पुणे | एड्सबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. एड्स संक्रमित बालकांना समाजात भेदभावाची वागणूक दिली जाते. तसेच त्यांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. अश्या परिस्थितीत या प्रश्नावर काम करणारे आणि भारतभर सायकलवर जनजागृती यात्रा करणारे डॉ.पवन चांडक यांनी कै.वस्ताद हरिभाऊ पोकळे माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
डाॅ चांडक मुळचे परभणी चे असून ते गेली काही वर्षे एड्स बाबत जनजागृती करण्याचे काम करत आहेत. जनजागृतीचा भाग म्हणून चांडक यांनी ३० नोव्हेंबरला शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना समजेल उमजेल अश्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एड्स संक्रमित बालकांच्या मूलभूत प्रश्नावर पुणे-अष्टविनायक- रायगड पुणे अशी यात्रा आज सहाव्या दिवशी धायरी येथील शाळेत संवाद साधून पूर्ण केली.
डाॅ चांडक यांनी आजवर सात राज्यात सायकल यात्रा केली असून ४० हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास केलेला आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हिरेमठ मॅडम, सौ.स्वाती मॅडम हे उपस्थित होते. छात्रभारतीचे संघटक लोकेश लाटे यांनी सामाजिक गीते विद्यार्थ्यांनकडून गाऊन घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशीद मणियार यांनी केले तर आभार श्री.संदीप दळवी यांनी केले.