औरंगाबाद | सिडको एन-6 सेक्टर संभाजी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसापासून ड्रेनेज लाईन चोकअप मधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने सर्वत्र घाणीचे राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाण पाणी दारात वाचत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे.
काही दिवसापूर्वी अशीच एक घटना मथुरा नगर भागात घडली होती. पुन्हा एकदा असाच प्रकार संभाजीनगर सेक्टर मध्ये घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. फारफार महानगरपालिकेला तक्रार करूनही उपाय योजना केल्या जातात नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सिडको एन-6 सेक्टर संभाजी कॉलनी मथुरानगर भागातील रस्त्यावर तसेच घरासमोर नाल्याचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी वाहिल्याने परिसरात डास, मच्छर आणि विविध प्रकारच्या कीटकांमुळे साथीच्या रोगाची नागरिकांना लागण झाली असल्याचे समोर येत आहे. पिण्याचे पाणी देखील दूषित आणि दुर्गंधीयुक्त येत असल्यामुळे तेथील रहिवाशांना फिल्टरचे पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.
याबाबत मनपा वॉर्ड अधिकारी यांना माहिती दिली असता, त्यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपाचे काम केले जाते. त्यातही स्थानिक नागरिकांकडून पैसे घेतले जातात. या भागात नवीन ड्रेनेज लाईन टाकून अतिरिक्त नवीन चेंबर बांधावे आणि पाण्याचा निचरा चेंबरमध्ये करावा. तसेच पूर्ण परिसर स्वच्छ करून तेथील पाण्यासंबंधीचा प्रश्न दूर करावा अशी मागणी सामजिक कार्यकर्ते मनीष नरवडे यांनी महानगरपालिकेला केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.