गोपीचंद पडळकर हा तर मोहरा; धनगर- मराठा दंगली पेटविण्याचा भाजपचा डाव- विक्रम ढोणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजित खुपसलाच, शिवाय दलाल निर्माण करून समाजाचा बुद्धीभेद केला. भाजपची सत्ता गेल्यानंतर, दीड वर्षापासून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी फडणवीस – चंद्रकांत पाटलांनी धनगर- मराठा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले आहे. त्या कारस्थानाचा मोहरा म्हणून आमदार गोपीचंद पडळकर हे विष पसरवण्याचे काम करत आहेत. भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विधानावरून भाजपचा हा कारस्थानी चेहरा उघडा पडला आहे. भाजपचे हे षढयंत्र खणून काढण्यासाठी लोणीकरांना अटक करावी, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

दोन दिवसांपुर्वी पडळकर यांनी सोलापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, त्याची प्रतिक्रिया म्हणून पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलेले असताना फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी पडळकरांवरील हल्ला हा धनगर समाजावरील हल्ला आहे, असे विधान केले आहे. हे विधान दंगलींना प्रोत्साहन देणारे आहे. पडळकरांची विधाने ही भाजप आमदार म्हणून आहेत, मात्र ती धनगर म्हणून दाखविण्याचा कुटील डाव भाजप सुरूवातीपासून खेळत आहे. या डावाचा भाग म्हणून धनगर समाजाला भडकावण्यासाठी लोणीकर यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणीकर यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे.

पडळकरांवरील हल्ला म्हणजे धनगर समाजावरील हल्ला कसा, याचे पुरावेही लोणीकरांनी द्यावेत, असेही आमचे आव्हान आहे. पडळकरांना धनगर समाजाने कुठेही नेता म्हणून जाहीर केलेले नाही. धनगर समाजाने त्यांना आमदार केलेले नाही, उलट राज्यात सर्वाधिक मताने हारणारा उमेदवार अशी त्यांची गणना केली आहे. पडळकरांना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी झोपेतून उठवून आमदार केले आहे. त्यामुळे त्यांचे सालगडी होवून पडळकर त्यांना हव्या तशा टोप्या टाकत आहेत. पडळकरांवरील दगडफेक ही फार तर फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या विरोधातील असू शकते, मात्र तिचा धनगर समाजाशी सुतराम संबंध नाही, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना सत्तेची खुर्ची न मिळाल्याने ते अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी धनगर समाजाला मराठा समाजाच्या विरोधात संघर्षास उभे करण्याची त्यांची षढयंत्रे सुरू आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी पडळकरांनी शरद पवारांविरोधात पंढरपुरात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केल्यावर प्रतिउत्तर म्हणून भाजपने धनगर समाजाच्या नावाखाली आंदोलने करून तणाव वाढवला. त्याचवेळी या विधानामागे मोठे षढयंत्र असल्याची तक्रार आम्ही कोल्हापुरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केली होती, मात्र त्याची चौकशी झाली नाही.

पुढील सहा महिन्यात पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा उद्घाटन सोहळ्याअगोदर जेजुरीत जावून हुल्लडबाजी केली. त्याप्रकरणी गुन्हे दाखल असूनही अद्याप कारवाई झालेली नाही. आपल्याला कोणी काही करत नाही, या भावनेने पडळकर सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्या विधानांचा आणि धनगर समाजाचा काहीही संबंध नाही, मात्र भाजपच्या फायद्यासाठी यात धनगर समाजाला ओढले जात आहे. वादंग, दंगल माजावी, हा यापाठीमागे पडळकर आणि भाजपचा स्पष्ट उद्देश आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेली आहेत, मात्र पोलिस यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरली आहे. भाजपचे षढयंत्र यशस्वी होताना दिसत आहे, असे दुर्दैवाने म्हणावे वाटते, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी फडणवीस- पाटील ही जोडी कोणत्या थराला जात आहे, हे महाराष्ट्र पाहतोच आहे, पण जातीय दंगे पेटविण्याची त्यांची कारस्थाने महाराष्ट्राचे दूरगामी नुकसान करणारी आहेत, त्यामुळे ही षढयंत्रे सरकार म्हणून बाहेर काढली पाहिजेत. यासंदर्भाने लोणीकरांना तातडीने अटक करून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment