सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात टंचाईच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. मागील काही महिने सुरु असलेल्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजना ऐन उन्हाळ्यात बंद आहेत. सिंचन योजनांच्या थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाकडून योजना बंद करण्यात आल्या आहेत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने पिकांना पाण्याची गरज असतना अचानक बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रातील पिकांना पाण्याची गरज आहे, त्यामुळे सिंचन योजना तात्काळ सुरु करुन दिलासा देण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे.
ताकारी सिंचन योजनेची ५० कोटी थकबाकी आहे. योजनेची थकबाकी वसूल होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वसुली झाली तरच पंपांची देखभाल दुरुस्तीसह पोटकालव्यांची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. ताकारी सिंचन योजना कारखान्यांकडून मिळणार्या पाणीपट्टीवर अविरतपणे सुरु होती. अन्य योजनांप्रमाणे ही योजना बंद पडत नाही, त्यामुळे शेतकर्यांना पाणी मिळते. टप्पा एक आणि दोनवरील पंपाव्दार कडेगाव, तासगाव, खानापूर आणि वाळवा तालुक्यातील गावांना पाणी दिले जाते. मिरज आणि पलूस तालुक्यातील काही गावंही योजनेचे समाविष्ट आहेत. मात्र या तालुक्यांना अद्याप पाणी दिले जात नाही. दुष्काळाची दाहकता वाढली आहे, परंतू योजना बंद असल्याने पिकांना पाणी देणे मुश्किल होवू लागल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेत म्हैसाळ योजनाही वीस दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यातील सहा पंप नादुरुस्त होवून बंद पडले आहेत. अपुर्या आणि नादुरुस्त पंपासह म्हैसाळ योजनोचे आवर्तन सुरु ठेवणे शक्य नाही. अकरा पंपापैकी पाच ते सहा पंप अचानक नादुरुस्त झाले. पर्यायी पंपही यापूर्वी दुरुस्त झाले आहेत. तरीही सहा पंप सुरु होते. पण त्यापुढील तीन टप्पे आणि जतमधील टप्प्याकरिता आवश्यक पाणी पाच-सहा पंपातून उचलून रोटेशन पूर्ण करता येत नसल्याने योनजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टेंभू योजनेचीही थकबाकीचा प्रश्नही भेडसावत आहे, त्यामुळे योजनेचे पाणी बंद आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे, त्यामुळे सिंचना योजना तात्काळ सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.