हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drina River House) दगदग, गोंधळ, गडबड, धावपळ यामधून थोडा का होईना आराम मिळावा असे कोणाला वाटत नाही? त्यामुळे अनेक लोक एकटं राहणं किंवा एकांत मिळेल अशा ठिकाणी जाऊन बसणं पसंत करतात. अशावेळी खास करून जिथे लोकांची फार गर्दी नसेल अशा निसर्गमय ठिकाणांची निवड केली जाते. एकांत शोधणारी लोकं अनेकदा जंगलात किंवा टेकडीवर जाताना दिसतात. मात्र, अशी ठिकाणं फार कमी लोकांना माहीत असतात. असंच एक खास ठिकाण सर्बियामध्ये आहे. ज्याविषयी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण इथे वाहत्या नदीच्या मधोमध एक मोठा दगड आहे आणि या दगडावर एक टुमदार घर बांधलं आहे. हे घर कुणी आणि का बांधलं? याविषयी जाणून घेऊया.
सर्बियातील सगळ्यात अनोखं घर (Drina River House)
एका वृत्तानुसार, सर्बियातील ड्रीना नदीच्या अगदी मधोमध एक विशाल महाकाय दगड विसावलेला आहे. या दगडावर गेल्या ५० वर्षांपेक्षाही जास्त काळापासून एक घर दिसून येत आहे. अत्यंत अनोख्या पद्धतीने बांधलेले हे घर येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून आकर्षण ठरले आहे. नॅशनल जिओग्राफिकवर या घराचा फोटो व्हायरल करण्यात आला होता. अगदी तेव्हापासून हे घर फार चर्चेत आहे आणि ते पहायला लांबून पर्यटक येत असतात.
कुठे आहे हे घर?
हे घर बॅजिना बास्ता नावाच्या एका वस्तीजवळ वाहणाऱ्या ड्रिना नदीत आहे. नदीच्या मधोमध असणाऱ्या एक मोठ्या दगडावर हे घर बांधलं गेलंय. जे टारा नॅशनल पार्कच्या अगदी जवळ आहे.
कोणी बांधलं हे घर?
स्थायिक मंडळी सांगतात त्यानुसार, ड्रीना नदीच्यामध्ये एका विशाल दगडावर बांधण्यात आलेलं हे घर ५० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे. (Drina River House) या घराची आतापर्यंत अनेकदा पडझड झाली आहे. मात्र, हे घर पुन्हा पुन्हा स्थायिकांकडून बांधले जाते. ही मंडळी सांगतात की, १९६८ मध्ये हे घर बांधण्यात आलं आहे. अत्यंत सुंदर आणि अनोख्या पद्धतीने या घराचे बांधकाम केले होते. त्यावेळी ड्रिना नदीत पोहायला आलेल्या एका ग्रुपला या ठिकाणाचा शोध लागला होता. जिथे त्यांनी पोहतेवेळी आराम करायला म्हणून निवारा शोधला आणि त्या दगडावर एक छोटंस घर बांधलं. यानंतर ते वारंवार या नदीत पोहायला आणि आपण बांधलेल्या घरात रहायला येत होते.
टुरिस्ट डेस्टिनेशन
सोशल मीडियावर या सुंदर घराचा जो फोटो व्हायरल होतोय तो फोटो हंगरीचे फोटोग्राफर बेकर यांनी काढल्याचे सांगितले जाते. खरंतर हा फोटो व्हायरल होण्याआधी लोकांना या घराबद्दल माहिती नव्हती. स्थायिक मंडळींव्यतिरिक्त कुणालाच या टुरिस्ट स्टेनेशनची कल्पना नव्हती. मात्र, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली. व्हायरल झालेल्या फोटोतून या घराची टिपलेली सुंदरता आपोआपच पर्यटकांना ओढून आणू लागली. (Drina River House) त्यामुळे आज बरेच लोक केवळ हे घर पाहण्यासाठी म्हणून इथे येतात. आजच्या घडीला हा स्पॉट टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध झाला आहे.