औरंगाबाद – दोन आठवड्यांपूर्वी राज्यकर जीएसटीतर्फे इ-वेबीलाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा इ-वेबील नसलेल्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या ४८ तासात करमाड येथीलटोल नाक्यावर साडेसहा हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. यात २७ वाहनधारकांकडून इ-वेबील नसल्याने तब्बल २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यकर सहआयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.
देशभरात १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा लागू झाला आहे. यात १ एप्रिल २०१८ पासून इ-वेबील प्रणाली देशभर लागू झाली. यामुळे राज्यांतर्गत एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल असेल तर परप्रांतात ५० रुपये हजार अधिक किमतीच्या मालाची वाहतूक करताना वाहनासोबत इ-वेबील असणे अनिवार्य केले आहे. ते बिल न बाळगणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरदूत त्या कायद्यात आहे.
ही कारवाई राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त रवींद्र जोगदंड सहाय्यक आयुक्त मकरंद कंकाळ, धनंजय देशमुख, माधव कुंभारवाड, तुषार गावडे या चार राज्यकर अधिकाऱ्यांतर्फे गेल्या ४८ तासात करण्यात आली. तसेच यापुढेही बिल तपासणीची मोहीम राबवून चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जी. श्रीकांत यांनी दिला आहे.