जमिन माझ्या नावावर कर..दारुड्या मुलाने केला वडीलांचा खून

सांगली | जमीन वादातून दारुड्या पोराने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना जत जवळील जाधव वस्तीवर मंगळवारी सायंकाळी घडली. या खूनप्रकरणी कृष्णा केशव जाधव यास जत पोलिसांनी अटक केली आहे, जतपासून दोन कि.मी. अंतरावर तंगडी वस्तीशेजारी असलेल्या जाधव वस्तीवर ही घटना घडली आहे.

केशव तात्यासो जाधव व त्यांचा मुलगा कृष्णा केशव जाधव हे दोघे एकाच ठिकाणी समोरासमोर वास्तव्यास आहेत. केशव जाधव यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. कृष्णा याला दारूचे व्यसन आहे. मयत केशव जाधव यांच्या नावावर 5 ते 6 एकर जमीन आहे.

पाण्याची कमतरता असल्यामुळे जमीन पडीक आहे. सदरची जमीन आपल्या नावावर करावी असा आग्रह कृष्णा जाधव याचा होता. कृष्णा जाधवला दारूचे व्यसन आहे म्हणून सदर जमीन कृष्णाच्या नावावर करण्यास वडिलांचा नकार होता. या जमीन वादातून कृष्णा आणि केशव जाधव यांच्यात सतत कुरबुर सुरू होती.

जमीन आपल्या नावावर करावी यासाठी कृष्णा हा केशव जाधव यास वारंवार त्रास करीत होता. कृष्णा याला केशव यांनी परस्पर सदर जमिनीचा व्यवहार केल्याचा संशय होता. यातूनच मयत केशव व कृष्णा यांच्यात खटके उडत होते. जत जवळच्या जमिनीची किंमत गगनाला भिडल्या आहेत आणी कमी किमंतीत जमीन केशव विकणार अशी भावना कृष्णा याची झाली होती.

यातूनच केशव व कृष्णा यांच्यात जमीन वाद विकोपास गेला होता. कृष्णा यांची आई श्रीमती हिराबाई हिला 10 वर्षांपूर्वी लकवा मारला आहे, तिचा सांभाळ केशव करीत असताना त्यांची दमछाक होत होती आणि मंगळवारी दुपारी यातच ठिणगी पडली.

कृष्णा जाधव यांच्या शेळीचे पिल्लू केशव जाधव यांच्या दारात गेल्याच्या कारणावरुन किरकोळ भांडणे झाली आणि याच वादातून सायंकाळी 5 वाजता कृष्णा व केशव या पितापुत्रात हाणामारी झाली. यामध्ये कृष्णाने केशव यांच्या डोक्यात व छातीवर काठीने मारहाण केली, डोक्यास जबर मार लागल्याने केशव यांचा मृत्यू झाला.