सारं काही पोटासाठी । अमृता जाधव
पावसाळा सरून आता हिवाळ्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. काही शहरांमध्ये अजूनही पावसाच्या हलक्या किंवा मोठ्या सरी कोसळणं सुरु आहे. अशा परिस्थितीत काहीतरी गोड आणि पौष्टिक खायचा मूड असेल तर दुधी हलवा ट्राय करायला हरकत नाही. साधारणपणे दुधीची भाजी म्हटली की घरातील बच्चेकंपनी तोंड वाकडं करत असते. मात्र कमी गोड स्वरूपातील दुधी हलवा हा कुटुंबातील सगळ्यांच्याच स्वास्थ्यासाठी लाभकारक ठरणार आहे. तुम्ही कधी ट्राय करताय मग – ‘लज्जतदार दुधी हलवा’
सर्वप्रथम साधारण अर्धा ते पाऊण किलो वजनाचा दुधी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली . त्यानंतर तो दुधी मध्यम आकाराच्या किसणीवर किसून घेतला. (मध्ये बिया असतील तर त्या शक्यतो काढून टाकाव्यात.) आता किसलेल्या दूधीला सुटलेले अधिकचे पाणी काढून टाकले. पिळून घेण्याची गरज नाही . कढईत २ मोठे चमचे तूप गरम झाल्यावर तर आवडीनुसार सुका मेवा परतून बाजूला काढून घेतला. त्याच तुपात किसलेला दुधी घालून मंद आचेवर सतत परतत राहिले . पाणी सुकले कि त्यात चवीनुसार साखर घालून पुन्हा व्यवस्थित परतत राहिले. साखरेला पाणी सुटून पुन्हा ते आटल्यानंतर त्यात साधारण १/२ लिटर कोमट दूध ओतून मिश्रण छान ढवळून घेतले. थोड्या वेळातच दूध आटू लागते. आवडत असल्यास हिरवा रंग घालू शकतो, मी घातला आहे. आता गॅस बंद करून त्यात १ चमचा वेलची पूड आणि तळलेला सुकामेवा घालून मिक्स केले. दुधी हलवा तयार. हा गरम किंवा फ्रीझ मध्ये ठेवून थंडगार सुद्धा सर्व्ह करू शकतो. चव खूपच छान लागते.