कोरोनामुळे टी – २० मुंबई लीग पुढे ढकलली मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरद्वारे माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती फार भयंकर आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टी २० मुंबई लीग मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. याची माहिती मुंबई लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मुंबई लीग मालिका पुढे ढकलत असल्याचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

‘देशातील सध्याची कोरोना स्थिती पाहता सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट लीगचे ३ रे पर्व पुढे ढकलत आहोत. पुढचा निर्णय येईपर्यंत हा आदेश लागू राहील’, असे जाहीर केलेल्या पत्रकात म्हणले आहे. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण आणि सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

डिसेंबर २०२० पासून मिलिंद नार्वेकर हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई लीग गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment