औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील अनेक गावांतील शासकीय रुग्णालयात लसीच्या साठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शासनाकडून मोफत केले जाणारे लसीकरण बंद आहेत. याच पाश्र्वभूमीवर कोणीही कोरोनाच्या लसी पासून वंचित राहू नये यासाठी गंगापूरचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांसाठी आजपासून खासगी रुग्णालयांत मोफत लसीकरण अभियान सुरू केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून, शासकीय रूग्णालयांसह खासगी रूग्णालयांतदेखील लसीचा तुटवडा काही प्रमाणात निर्माण झाला आहे. प्रशासनाने दोन दिवसांत लसीचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र काही जिल्ह्यातील कोरोनाचा झालेला विस्फोट पाहता मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.
सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीही आता खासगी रूग्णालयांच्या माध्यमातून मोफत देण्यासाठी सरसावले असून, ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. त्याच अनुषंगाने गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे स्वखर्चाने हे अभियान राबवत आहेत. त्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढे येउन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.