कराड | कराड- हेळवाक महामार्गाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. पाटण तालुक्यातील विहे गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमिनीचा मोबदला जमा करण्यात आला आहे. चार वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले होते, मात्र, शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नव्हता. तेव्हा शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृष्णत क्षीरसागर यांनी उपविभागीय अधिकारी पाटण यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश आले आहे.
गेल्या चार वर्षांपूर्वी कराड- हेळवाक- पाटण या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले. यावेळी महामार्ग लगत असणाऱ्या पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून मिळाला नव्हता. त्यानंतर रयत क्रांती संघटनेचे विहे येथील कृष्णत क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला. या महामार्गाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यांना आ. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सचिन नलवडे व कृष्णात क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळावा, यासाठीचे निवेदन दिले होते.
या पाठपुराव्यामुळे विहे गावातील बाधित शेतकरी प्रकाश क्षीरसागर, संतोष पाटील, प्रमोद धुमाळ यांच्या खात्यावरती बाधित जमिनीचा मोबदला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जमा करण्यात आला. बाधित शेतकरी व रयत क्रांती संघटना यांनी पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न केले, याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, पाटण तालुका अध्यक्ष कृष्णात क्षीरसागर, विकास हादवे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब देसाई, हेमंत पाटील, योगेश झांबरे, संतोष पाटील उपस्थित होते.