औरंगाबाद – महानगरपालिकेच्या मेल्ट्रोन कोवीड रुग्णालयात पॉझिटिव रुग्णांच्या जागी दोन कोरोना रुग्ण एजंट करवी भरती करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी समोर आला. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली असून, फरार असलेल्या दोन मूळ पॉझिटिव रुग्णांपैकी गौरव काथार या एका कोरोना रुग्णास सुरक्षितता बाळगत वेदांतनगर पोलिसांनी काल ताब्यात घेतले.
सिद्धार्थ उद्यान येथे कोरोनाची ॲंटीजेन चाचणी केल्यानंतर पॉझिटिव निघालेल्या दोन तरुणांना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मेल्ट्रोन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, सोमवारी हे दोन्ही रुग्ण डमी असल्याचे समोर आल्याने मनपाची झोप उडाली. मुळात पॉझिटिव्ह असलेले उस्मानपुरा येथील गगन पगारे व माडा कॉलनी येथील गौरव काथार फरार असून त्यांच्या जागी डमी रुग्ण म्हणून जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी गावचे आलोक राठोड व अतुल सदावर्ते यांना दोन एजंटनी दहा हजार रुपयांचे आमिष दाखवत भरती केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर मेंढरांच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राठोड व सदावर्ते यादमी रुग्णांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.
मी उद्यानात गेलो नाही, टेस्ट झाली नाही, मग मी कोरोनाबाधित कसा ?
पोलिसांनी गौरव काथार याला ताब्यात घेतल्यावर त्याचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. “मी सिद्धार्थ उद्यानात गेलो नाही. माझी कोरोना चाचणी झाली नाही. मी पॉझिटिव्ह आलो नाही तरीदेखील पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला” गौरव चे हे वाक्य ऐकून मेल्ट्रोन च्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर चक्रावून गेल्या. त्यांनी गौरव ची पुन्हा टेस्ट केली असता ती निगेटिव आली. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली. त्याचा अहवाल आज प्राप्त होणार आहे. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामुळे मनपाच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.