हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा – कास मार्गावर यवतेश्वर घाटाच्या उतारावर ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपररचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये डंपरचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
शिवशंकर संभाजी भोसले (वय 30, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवशंकर भोसले हा डंपर (MH11 BL 2680) चालवत यवतेश्वर घाटातून साताऱ्यात येत होता. घाट रस्त्यातून येत असताना येथील पावर हाऊसजवळ आल्यानंतर त्यांच्या डंपरचा ब्रेक फेल झाला. डाव्या बाजूला दरी आणि काही घरे होती. यावेळी अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालक शिवशंकर याने डंपर डोंगराला धडकविला. हा डंपर उतारावर असल्यामुळे डंपरचा वेग वाढला.
त्यामुळे डोंगराला डंपर जोरदार धडकला. या अपघातात चालक शिवशंकर भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी बामणोलीहून रुग्णवाहिका येत होती. त्या रुग्णवाहिकेतून शिवशंकर याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.