टीम हॅलो महाराष्ट्र । भारतातील बहुतांश ई-कॉमर्स कंपन्या नियमित ग्राहकांचा किरकोळ व्यवहार अधिक सुलभ व्हावा यासाठी २ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार विना ओटीपी (वन टाइम पासवर्ड) करण्याची तयारी बहुतांश ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म करत आहेत. फ्लिपकार्टने अगोदरच आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा सुरु केली आहे. शिवाय स्विगी आणि ऑनलाइन कॅब सेवा कंपन्याही ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
भारतीय रिजर्व्ह बँकेकडून टप्प्या-टप्प्याने नियमात ही सूट देण्यात आल्यामुळे विना ओटीपी व्यवहार शक्य झाला आहे. व्यवहार अधिक सुलभ बनवण्यासाठी विना ओटीपी ट्रान्झॅक्शनची मुभा बँकांना देण्यात आली होती. पेटीएम पेमेंट गेटवेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुनित जैन यांच्या मते, कंपनी मर्चंट्सकडून अधिकाधिक विना ओटीपी क्रेडिट कार्ड पेमेंट यावेत यासाठी तयारी करत आहे.
दरम्यान, एकीकडे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स सुरळीत केले जात आहेत, तर एटीएममधून रक्कम काढण्यासाठी सुरक्षा अधिक मजबूत केली जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी सुविधा आणली आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागेल, अशी माहिती खुद्द एसबीआयनेच ट्वीट करुन दिली होती. बँकेत ग्राहकाचा जो नंबर नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाईल आणि या माध्यमातून पैसे काढता येतील.