औरंगाबाद | आता नागरिकांना संगणीकृत सातबारा नव्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. नवीन सातबारा नागरिकांना सहजरित्या समजण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या काळात विभागातील अधिकारी व कर्मचारी याचे योगदान मोठ असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्याक्रमात सिल्लोड येथून दुरदृष्यप्रणालीद्वारे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सहभागी झाले होते. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते 1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नविन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ कळ दाबून करण्यात आला.
यावेळी दुरदृष्यप्रणालीद्वारे औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी पुणे येथून आमदार संग्राम थोपटे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन.के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांच्यासह संबंधीत विभागचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले, नागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच बरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. आज पासून नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा करुन देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्यावतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे असे महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले.
येत्या काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण पीकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहे. ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे महत्वपूर्ण योगदान असणार आहे, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले. महसूल,नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव करीर म्हणाले, महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. महसूल गोळा करण्याबरोबरच नागरिकांचे जीवन अधिक समृध्द करण्यासाची विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यानुसार काळानुरुप बदल केले पाहिजे. ई-पीक पाहणी कार्यक्रमाची राज्यभर व्याप्ती वाढवणार असल्याचे करीर म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प रामदास जगताप,वरिष्ठ तांत्रिक संचालक समीर दातार, वरिष्ठ तांत्रिक संचालक शुभांगी राव, नगर भूमापन कक्षाचे कार्यासन अधिकारी संजय धोंगडे, नायब तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नगर भूमापन कक्षाचे शिरस्तेदार शिवाजी पंडित,तलाठी शामल काकडे, अर्चना पाटणे, सचिन भैसाडे, कृष्णा पास्ते,अव्वल कारकून डॉ. गणेश देसाई व महेंद्र गंबरे या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोनाच्या काळात निधन झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले, तर आभार प्रदर्शन ई-फेरफार समनव्यक रामदास जगताप यांनी मानले.