राजाश्रय गरजेचा : कुस्तीपटूच्या मानधनात वाढीसाठी खा. श्रीनिवास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनामुळे बंद असलेली कुस्त्यांची मैदाने त्यातच वाढत चाललेल्या महागाईने कुस्तीपटूना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवंगत हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्या कुटुंबातील विधवा पत्नी, उत्तराधिकारी मुलांना तसेच सध्या हयात असणा-या पैलवानांना महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणा-या मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात खा.श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे, मी स्वतः कुस्तीशौकिन असल्याने अनेक दिवंगत हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवानांना ओळखत होतो. तसेच सध्या हयात असणा-यांना देखील ओळखतो. अनेक महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी मल्ल गावोगावी जत्रेवर भरणा-या कुस्त्यांच्या फडात मला भेटतात. अनेक फडावर हजेरी लावल्यावर गावकरी तसेच कुस्ती शौकिन कौतुक म्हणून वाटखर्ची रूपाने अशा पैलवानांना आदराने सन्मानधन देतात तसेच त्यांना मानाने वागविण्यावची प्रथा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. त्यांच्या खुराकाचा खर्च फडावरच्या लढतीवर मिळणा-या मानधनातून भागविता येत असे. याशिवाय निवृत्त पैलवान हेच पुढे वस्ताद, प्रशिक्षक म्हणून नवीन पैलवान तयार करतात. मात्र गेली दोन वर्षे ते करोनाच्या अडचणीमुळे शक्य झालेले नाही. कोरोना संसर्गामुळे यात्रा, उत्सवातून आयोजित होणारी कुस्त्यांची मैदाने थांबली आहेत. त्यातच महागाई आभाळाला भिडली आहे. परिणामी उत्तराधिका-यांना आणि हयात मानक-यांना आपले कुटुंब चालविणे अशक्य झाले आहे. ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पैलवानांना खुराक आणि उदरनिर्वाहासाठी खुप संघर्ष करावा लागत आहे.

आपण अशा सर्व सन्माननीयांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्लांच्या मानधनात भरघोस वाढ करावी अशी मागणी राज्यातील अनेक मल्ल आणि कु‍स्ती आखाड्यांमार्फत होत आहे. यासंदर्भात आपणाकडून सहानुभूती पूर्वक निर्णय घेण्यात यावा. महाराष्ट्राच्या संस्कृतीतील घटक असलेला पैलवान घडविण्यामध्ये लोकसहभाग व राजाश्रय महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात भरीव वाढ करावी अशी विनंती खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

Leave a Comment