बीड । गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. त्यांना शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेणं भोवलं असून, अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता रात्री उशिरा ईडीने कारवाईत जप्त केलीय. (ED Action On RSP MLA Ratnakar Gutte Yogeshwari Hatchery Property) रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लुटून ती रक्कम आपल्या कंपनीत गुंतवल्याचाही गुट्टेंवर आरोप ठेवण्यात आलाय. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असून, ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेऊन गुट्टे यांनी आपल्या विविध कंपन्यात गुंतवणूक केली असून, गंगाखेडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटकही झाली होती. बीडमधील गुट्टेंच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली.
शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज लाटल्याचा रत्नाकर गुंट्टेंवर आरोप आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपन्यांची परभणी, बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केलीय.
काय आहे प्रकरण?
गंगाखेड शुगर कारखान्याने शेतकरी सभासदांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर 328 कोटी रुपयांचे पीक कर्ज घेतल्याचे खंडपीठात सांगण्यात आले होते. यूको, आंध्रा, सिंडिकेट अशा नागपूर, नांदेड, परभणी येथील शाखेतून कर्ज घेतले होते. 2017 साली गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रत्नाकर गुट्टे यांना मार्च 2019 साली अटक झाली, त्यादरम्यान निवडणूक लागल्या होत्या, जेलमध्ये राहून गुट्टे यांनी रासपकडून अर्ज भरला आणि जेलमधून निवडून येत आमदार झाले. गुट्टेंच्या कारखान्यामुळे गंगाखेडचं अर्थकारण बदलेल या आशेवर लोकांनी त्यांना निवडून दिलं. तोच बंद झाला तर त्याला बंद करणाऱ्याविरोधात भावना तीव्र होत असल्याचंही गेल्या काही काळात दिसून आलंय. ED Action On RSP MLA Ratnakar Gutte Yogeshwari Hatchery Property
शरद पवारांना का भेटले होते जानकर, गुट्टे?
कोर्टानं क्रशिंगला परवानगी दिली तरी कारखान्याला ज्या अटी, शर्थी लावल्या होत्या, त्या जाचक असल्याचा दावा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला होता. अशाच अटी जर इतर कारखान्यांना लावल्या तर राज्यातला एकही साखर कारखाना चालणार नाही असही गुट्टे म्हणाले होते. ह्या अटी साखर आयुक्तांनी लावलेल्या आहेत. त्या काढाव्यात अशी विनंती करण्यासाठी गुट्टेंनी अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. अर्थातच सोबत महादेव जानकरही होते. अजित पवारांच्या भेटीवरच जानकर गुट्टे थांबले नाहीत तर ते लगेचच शरद पवारांच्याही भेटीला गेले होते. तिथंही त्यांनी गंगाखेड शुगरवर लादलेल्या जाचक अटींची तक्रार केल्याचं सांगितलं होतं. पण याच भेटीत जानकर, गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांचीही तक्रार केल्याची चर्चा गंगाखेडमध्ये स्थानिक पातळीवर आहे.
कोण आहेत रत्नाकर गुट्टे?
रत्नाकर गुट्टे हे रासप नेते आणि आमदार आहेत. जेलमध्ये राहून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला होता. रत्नाकर गुट्टे यांनी 2014 मध्येही विधानसभा निवडणूक लढवली होती. रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जातात, मात्र ते जानकर यांच्या पक्षात आहेत. रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणघाटचे रहिवासी आहेत. परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते, तिथून पुढे स्वत: कंत्राटं घेण्यास सुरुवात केली आणि बडे कंत्राटदार झाले. रत्नाकर गुट्टे यांची सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या माध्यमातून त्यांनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली
गंगाखेड शुगर या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याचा आरोप गुट्टे यांच्यावर आहे
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’