औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलसोबत खाद्यतेलाचे भाव भरपूर वाढले होते. आता सोमवार पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता खाद्य तेलाच्या किमतीत प्रति लिटर पाच रुपये घट होणार आहे.
शेंगदाणा, करडई, सरकी, रिफाईंड तेल, सोयाबीन, सूर्यफूल, पाम, वनस्पती तूप, मोहरीच्या तेलाच्या किमती आता कमी होणार आहे. यावर्षी भुईमुगाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. परंतु कोरोना महामारीमुळे देशात शेंगदाण्याच्या मागणीला भाव नसल्यामुळे तेलाच्या किमतीत अजून घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर करडीचे पीक वर्षातून एकदाच येते. परंतु मध्यंतरी झालेल्या गारपिटीचा फटका या पिकाला बसल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे करडईच्या तेलाच्या किमतीत फारशी घट होण्याची चिन्हे नाहीत.
शेंगदाणा तेल याप्रमाणे भविष्यात सोयाबीन आणि सरकीच्या तेलाच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे. देशात शेंगदाणा मोठ्या प्रमाणात पडून असून देशी बाजारपेठेला त्यामुळे फायदा होईल अशी अपेक्षा तेल व्यवसाय जगन्नाथ बसैये यांनी व्यक्त केली आहे.